​सावंतवाडी : आंबोली-दोडामार्ग वनक्षेत्रातील वन्यजीव शिकार प्रकरण: ९ आरोपींची जामिनावर सुटका

शेअर करा

सावंतवाडी,दि.२० जून
आंबोली-दोडामार्ग संवर्धन राखीव वनक्षेत्रातील मासुरे आणि नेने या दोन वेगवेगळ्या ठिकाणी दुर्मिळ वन्यजीवांची शिकार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या व फरार झालेल्या अशा एकूण ९ जणांची न्यायालयाने प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली आहे. संशयितांच्या वतीने ॲड. परिमल नाईक यांनी न्यायालयात काम पाहिले.
​वनविभागाने बुधवारी रात्री दोन वेगवेगळ्या कारवाया करत वन्यजीवांची शिकार करणाऱ्या टोळीला जेरबंद केले होते. या कारवाईत आरोपींकडून जिवंत व मृत वन्यजीव, शिकारीचे साहित्य आणि एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आले होते.
​पहिली कारवाई (गाव मासुरे):
गुप्त माहितीच्या आधारे वनविभागाच्या पथकाने मासुरे वनक्षेत्रात दीड किलोमीटर पाठलाग करून विठू वाघु कोकरे (वय ४५, रा. चौकुळ, सावंतवाडी) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून बेकायदेशीर ठासणीच्या बंदुकीसह शिकार केलेले ‘साळिंदर’ जप्त करण्यात आले. त्याच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ व भारतीय वन अधिनियम १९२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
​दुसरी कारवाई (गाव नेने – शिरगांवकर पॉईंट):
नेने राखीव वनक्षेत्रात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या तीन जणांचा पाठलाग केला असता, त्यांच्याकडे मृत ‘पिसोरी’ आणि ‘कटीदर (फटकुर)’ हे वन्यप्राणी आढळून आले. याच दरम्यान त्यांच्या इतर चार साथीदारांना चारचाकी वाहनासह ताब्यात घेण्यात आले, तर दोन जण घटनास्थळावरून फरार झाले होते.
​यात पवन प्रकाश देसाई, जावेद सलीम जमादार, हसीम हुसेन काजी, वनु विठ्ठल फोंडे, आकाश मोहन कुरणे (सर्व रा. कोल्हापूर जिल्हा), भरत नवलू पाटील (रा. चौकुळ, सावंतवाडी) आणि गणेश तुकाराम पाटकर (रा. पिंपरी चिंचवड, पुणे) यांना अटक करण्यात आली होती. तर लक्ष्मण पाटील व संदीप यमकर हे दोघे फरार झाले होते.
​न्यायालयीन कारवाई:
अटक केलेल्या आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना २० जूनपर्यंत तीन दिवसांची वनकोठडी सुनावली होती. आज कोठडीची मुदत संपल्याने वनविभागाने आठ जणांना न्यायालयात हजर केले. तसेच, फरार असलेल्या दोघांनाही त्यांच्या वकिलांमार्फत न्यायालयात हजर करण्यात आले. ॲड. परिमल नाईक यांनी केलेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने सर्व ९ जणांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचा जामीन मंजूर केला.
​सदर यशस्वी कारवाई उपवनसंरक्षक मिलीश शर्मा आणि सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल वैभव भिसे व त्यांच्या पथकाने केली होती.

शेअर करा