सिंधुदुर्ग : कोकणात गणरायाचे जल्लोषात आगमन; ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने दुमदुमली घरे!

शेअर करा

ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांचे भव्य स्वागत; विधिवत पूजा-अर्चेनंतर आरतीने भक्तिमय वातावरण

सिंधुदुर्ग,दि.१४ सप्टेंबर

कोकणातील सर्वात मोठा आणि उत्साहाचा सण म्हणून गणेश चतुर्थीकडे पाहिले जाते. आज गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कोकणातील अनेक घरांमध्ये गणरायाचे मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले.

ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाचे स्वागत केले. गणेशमूर्ती घरी आणल्यानंतर विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली.

पूजा-अर्चा झाल्यानंतर कुटुंबीयांनी एकत्र येत गणरायाची आरती केली. यावेळी घराघरांत भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. गणरायाच्या आगमनाने कोकणातील प्रत्येक घरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

गणरायाच्या स्वागतासाठी अनेक कुटुंबांनी आपल्या घरी आकर्षक तसेच विविध सामाजिक आणि पर्यावरणपूरक संदेश देणाऱ्या सजावटी केल्या आहेत. सजावटीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, वृक्षसंवर्धन यांसह विविध संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात भक्तीबरोबरच पर्यावरणपूरक विचारांनाही महत्त्व दिले जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान, गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आज रात्रीपासून अनेक घरांमध्ये विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भजन, आरती तसेच अन्य धार्मिक कार्यक्रमांमुळे रात्रीच्या वेळीही घराघरांत भक्तिमय वातावरण पाहायला मिळणार आहे. गणरायाच्या आगमनाने कोकणातील वातावरण पूर्णपणे गणेशमय झाले असून पुढील काही दिवस ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’चा जयघोष आणि भजनांच्या स्वरांनी प्रत्येकाचे घर दुमदुमणार आहे

शेअर करा