सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरजू विद्यार्थी, महिला व दिव्यांगांसाठी मोफत साहित्य वाटप
सिंधुदुर्ग,दि.०५ सप्टेंबर
समाजातील असमानतेची दरी पूर्णतः भरून काढणे कदाचित शक्य नसले, तरी ती अधिक खोल जाऊ न देणे हे निश्चितच आपल्या हातात आहे. दुसऱ्यासाठी जगणे, त्यांच्या जगण्याला आधार देणे आणि गरजू व्यक्तींचे परावलंबित्व कमी करण्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान दिले पाहिजे. समाजातील विषमता दूर करणे हेच आपले उद्दिष्ट असावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा सिंधुदुर्गचे पालक न्यायमूर्ती श्याम चांडक यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा व सत्र न्यायालय, सिंधुदुर्ग आणि हेतु चॅरिटेबल ट्रस्ट, मालाड, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वस्तू वाटप शिबिरात ते अध्यक्षीय भाषण करत होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरजू विद्यार्थी, महिला व दिव्यांग व्यक्तींना विविध आवश्यक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.
हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा सिंधुदुर्गचे पालक न्यायमूर्ती श्याम चांडक, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती फरहान दुबाश, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अमित जामसंडेकर, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती कमलकिशोर तातेड आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे उपस्थित होत्या.
अध्यक्षीय भाषणात न्यायमूर्ती श्याम चांडक म्हणाले की, दुसऱ्याच्या जीवनाला आधार देणे, त्यांच्या अडचणी कमी करणे आणि गरजू व्यक्तींना स्वावलंबी बनविणे ही सामाजिक जबाबदारी आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती कमलकिशोर तातेड यांनी गरजू व्यक्तींना केवळ तात्पुरती मदत न करता त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता येईल आणि स्वावलंबी बनता येईल, अशा स्वरूपाची मदत करण्याची गरज व्यक्त केली. समाजातील प्रत्येक गरजू व्यक्ती स्वयंपूर्ण व्हावी, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
हेतु चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव रिखब जैन यांनी ट्रस्टच्या कार्याची माहिती देताना सांगितले की, गेल्या १५ वर्षांपासून ट्रस्ट दिव्यांग आणि आदिवासी बांधवांसोबत विविध क्षेत्रांत काम करीत आहे. न्यायमूर्ती श्याम चांडक यांनी अशा समाजोपयोगी उपक्रमांना नेहमीच पाठबळ दिले आहे. दिव्यांग व्यक्तींच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी हेतु चॅरिटेबल ट्रस्ट कार्यरत असून शालेय विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्तीच्या माध्यमातून मदत केली जाते. ज्या लाभार्थ्यांना भविष्यातही आवश्यक साहित्याची गरज भासेल, त्यांना शक्य ते सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी जिल्हा न्यायालय आणि विधीलेखा सदन या भूखंडांचे स्वतंत्र सातबारे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाल्या की, सिंधुदुर्गनगरी येथील मुख्यालयातील महत्त्वाच्या आस्थापनांसाठी भूखंड नावावर करण्याचे काम पूर्ण करता आले, याचा विशेष आनंद आहे.
प्रास्ताविक करताना सचिव आर. व्ही. नडगदल्ली म्हणाले की, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांना अशा समाजोपयोगी कार्यक्रमांची झालर प्राप्त झाली आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून नागरिकांना विविध विधी सेवा उपक्रमांद्वारे आवश्यक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते. त्यांनी सिंधुदुर्गनगरीच्या निर्मितीनंतर येथील विविध आस्थापना आणि नागरिकांना स्वतंत्र सातबारा उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्गचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. व्ही. नडगदल्ली, हेतु चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव रिखब जैन, महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे सदस्य अॅड. संग्राम देसाई, जिल्हा सरकारी अभियोक्ता अॅड. एस. ए. राणे, जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. परिमल नाईक तसेच एम. एस. कवाड ट्रस्टचे ट्रस्टी विकास कवाड उपस्थित होते.
शिबिराचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने आणि भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या पूजनाने करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. व्ही. नडगदल्ली यांनी केले.
या शिबिरामध्ये गरजू ६० हून अधिक विद्यार्थ्यांना शालेय साहित्य (छत्री, दफ्तर, वह्या, आदी), १५ महिलांना शिलाई मशीन, तर १५ दिव्यांग व्यक्तींना व्हीलचेअर आणि कानाचे मशीन देण्यात आले. तसेच मेडिकल बेड, वॉशिंग मशीन, पंखे, एलईडी टीव्ही, इन्व्हर्टर, जनरेटर, पाण्याचे पंप यांसह विविध आवश्यक वस्तूंचे लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी मोहनलाल सायर चंद ट्रस्ट यांचेही सहकार्य लाभले.
या वस्तू वाटप शिबिरामागील मुख्य हेतू गरजू व्यक्तींचे परावलंबित्व कमी करून त्यांना अधिक सक्षम आणि स्वावलंबी बनविणे हा आहे. हेतु चॅरिटेबल ट्रस्टसारख्या संस्था समाजातील दुर्बल आणि गरजू घटकांसाठी अत्यंत मोलाचे कार्य करीत आहेत. समाजातील विषमता दूर करण्यासाठी शासन, न्यायव्यवस्था, स्वयंसेवी संस्था आणि नागरिक या सर्वांनी एकत्रितपणे योगदान देणे आवश्यक आहे, असे आवाहन न्यायमूर्ती श्याम चांडक यांनी केले.
कार्यक्रमाचा समारोप प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुधीर देशपांडे यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. वस्तू वाटप शिबिराच्या आयोजनासाठी सहकार्य केलेल्या सर्व सहभागी यंत्रणा, संस्था आणि व्यक्तींचे त्यांनी आभार मानले. तसेच समाजातील गरजू आणि दिव्यांग व्यक्तींसाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या हेतु चॅरिटेबल ट्रस्टचे विशेष अभिनंदन करून त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.