तळेरे : कासार्डे नागसावंतवाडीत ७१ वृक्षांचे वृक्षारोपण; निसर्ग संवर्धनाचा स्तुत्य उपक्रम 🌳🌿

शेअर करा

तळेरे,दि.२८ जून
बेसुमार वृक्षतोडीमुळे अलीकडच्या काळात संपूर्ण वातावरण वेगाने बदलू लागले आहे. या बदलत्या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि निसर्गाचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करणे ही काळाची गरज बनली आहे. याच सामाजिक जाणिवेतून कासार्डे नागसावंतवाडी येथील श्री गवळदेव मंदिर परिसरात ७१ विविध वृक्षांचे वृक्षारोपण करून निसर्ग संवर्धनाचा स्तुत्य उपक्रम कासार्डे नागसावंतवाडी हितवर्धक मंडळ, मुंबई यांच्यावतीने राबवण्यात आला.

कासार्डे नागसावंतवाडी हितवर्धक मंडळ, मुंबई यांच्यावतीने या विशेष वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी आणि पर्यावरण संरक्षणासाठी १० नारळाची, १० सुपारीची झाडे आणि ५१ बांबू अशा एकूण ७१ उपयुक्त झाडांचे रोपण करण्यात आले.
कासार्डे नागसावंतवाडी हितवर्धक मंडळ, मुंबई ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईसह कोकणात विविध सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रम अतिशय प्रभावीपणे राबवित आहे. आजवर या मंडळाच्या माध्यमातून रक्तदान शिबीर, मोफत आरोग्य शिबीर, अवयवदान जनजागृती शिबीर अशा अनेक लोकोपयोगी कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले असून, समाजोपयोगी कामात या मंडळाचा नेहमीच मोठा वाटा राहिला आहे.

हा वृक्षारोपण कार्यक्रम मंडळाचे अध्यक्ष धर्माजी शांताराम वंजारे, उपाध्यक्ष अतुल अरविंद सावंत, खजिनदार विजय बाबाजी वंजारे आणि सरचिटणीस (सेक्रेटरी) उदय सावंत यांच्या संकल्पनेतून व योग्य मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. गावच्या सर्व स्थानिक कार्यकर्त्यांनी अत्यंत नियोजनपूर्वक एकत्र येत हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. या मोहिमेला मंडळाच्या मुंबई आणि स्थानिक पातळीवरील सर्वच आजी-माजी कार्यकर्त्यांचे व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.

शेअर करा