वैभववाडीत NEET पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

शेअर करा

स्पर्धा परीक्षांतील गैरव्यवहाराविरोधात विरोधी पक्ष आक्रमक; ‘विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवा’ म्हणत तहसीलदारांमार्फत पंतप्रधानांना निवेदन

वैभववाडी,दि.२० जुलै

NEET सह देशातील विविध स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार होणारे गैरव्यवहार, पेपरफुटी आणि परीक्षा पद्धतीतील अपारदर्शकतेमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. या सर्व प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, या मुख्य मागणीसाठी वैभववाडीतील सर्व विरोधी पक्षीय पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत तहसीलदार यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन सादर केले.
    ​विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवा!
​निवेदनात नमूद केल्यानुसार, गेल्या काही वर्षांपासून अहोरात्र मेहनत करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कष्टावर पेपरफुटीसारख्या प्रकारांमुळे पाणी फेरले जात आहे. यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये अत्यंत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. देशातील शिक्षण व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास टिकवून ठेवण्यात केंद्र सरकार आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालय पूर्णपणे अपयशी ठरले आहे. याशिवाय, विद्यार्थ्यांचे भविष्य आणि पारदर्शक शिक्षण व्यवस्थेसाठी मॅगसेसे पुरस्कार विजेते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या शांततामय आंदोलनालाही या निवेदनाद्वारे जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला आहे.
​प्रमुख मागण्या:
​शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा: केंद्रीय शिक्षण मंत्री मा. धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्काळ राजीनामा द्यावा.
​निष्पक्ष चौकशी: NEET व इतर सर्व स्पर्धा परीक्षांमधील गैरव्यवहारांची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली किंवा स्वतंत्र उच्चस्तरीय समितीमार्फत निष्पक्ष चौकशी करण्यात यावी.
​कठोर कारवाई: पेपरफुटी व गैरव्यवहारात सहभागी असलेल्या सर्व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी.
​परीक्षा प्रणालीत सुधारणा: राष्ट्रीय परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्यासाठी तातडीने प्रभावी सुधारणा लागू कराव्यात.
​शासकीय हमी: विद्यार्थ्यांच्या हिताचे संरक्षण करून त्यांच्या भविष्याशी असा खेळ पुन्हा होणार नाही, याची शासनाने लेखी हमी द्यावी.अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
​​   यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे श्री. नंदकुमार शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे श्री. रवींद्र चव्हाण, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे श्री. सचिन तावडे, आणि काँग्रेसचे श्री. दादा नेवरेकर यांच्यासह गुलजार काझी, स्वप्निल रावराणे, रुपेश वारंग, दिव्या पाचकुडे, मनोज सावंत,दिलीप राणे, विनोद विटेकर, उमाकांत राणे, अहमद बोबडे, यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा