वैभववाडी : करूळ चेकनाक्यावर मोठी कारवाई; गुजरातच्या दोघांकडून ५.६५ लाखांची गोवा बनावटीची विदेशी दारू व कार जप्त 🚔🍾

शेअर करा

करूळ चेकनाक्यावर वाहन तपासणीदरम्यान पोलिसांनी गुजरातमधील दोन आरोपींना ताब्यात घेत गोवा बनावटीची विदेशी दारू व कारसह एकूण ५ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे

वैभववाडी,दि.२५ जून
करूळ चेकनाका येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत गुजरात येथील दोन आरोपींकडून गोवा बनावटीची विदेशी दारू व कार असा एकूण 5 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करूळ चेकनाका येथे तपासणीदरम्यान संशयित वाहन अडविण्यात आले. यावेळी मगशुद झुसब अनअड (वय 37, रा. कस्तुरबाग सोसायटी, मार्केट यार्डजवळ, दौलतपरा, ता. जि. जुनागड, गुजरात) व परवेश वाहिद मिया सय्यद (वय 32, रा. जेलरोड, पोस्ट पार्टसमोर, कोळीवाडा सावली गल्ली, ता. जि. जुनागड, गुजरात) यांच्याकडून गोवा राज्यातून आणलेली विदेशी दारू आढळून आली.
या कारवाईत हुंडाई एक्सेंट कंपनीची जीजे-27-बीई-1817 क्रमांकाची कार (किंमत 5 लाख रुपये) जप्त करण्यात आली. तसेच 180 मिली मापाच्या गोवा बनावटीच्या 48 सीलबंद बाटल्या (किंमत 34,560 रुपये), ब्रोकन हार्ट मुलबेरी क्लासिक व्होडका या ब्रँडच्या 180 मिली मापाच्या 48 बाटल्या (किंमत 12,960 रुपये) आणि ब्रोकन हार्ट ग्रीन अॅपल लेबल असलेल्या 180 मिली मापाच्या 48 बाटल्या (किंमत 17,280 रुपये) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बाईत करीत आहेत.

शेअर करा