वेंगुर्ल्यात ठिकठिकाणी वटपौर्णिमा उत्साहात
वेंगुर्ला ,दि.२९ जून
वेंगुर्ला तालुक्यासह ग्रामीण भागातील महिलांनी आज वटपौर्णिमेचा सण मोठ्याा उत्साहात साजरा केला. सुहासिनी महिलांनी वटवृक्षाची पूजा करुन आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. काही महिलांनी वटवृक्षाकडे एकत्र येत तर काही महिलांनी घरोघरी वटवृक्षाच्या फांदीचे पूजन करीत या सणाचा आनंद द्विगुणीत केला. तर अधूनमधून पाऊसही हजेरी लावत होता.
वेंगुर्ला शहरात साकव व घोडेबांव उद्यान येथे आज सोमवारी महिलांची वर्दळ दिसत होती. ब्राह्मणांच्या मंत्र घोषात महिलांनी वटवृक्षाची पूजा केली. नविन लग्न झालेल्या नवदांपत्यांची ही पहिलीच वटपौर्णिमा होती. त्यामुळे अशा नवदांपत्यांनी एकत्रित वटवृक्षाची पूजा केली. महिलांनी वटवृक्षाला धागा गुंडाळून आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे यासाठी प्रार्थना केली. त्यानंतर एकमेकांना रानमेव्यांचे वाण देऊन शुभेच्छा दिल्या.
फोटोओळी – 1) साकव येथील वटवृक्षाजवळ महिलांनी एकत्र येत वटपौर्णिमा साजरी केली.
2) घोडेबांव येथील वटवृक्षाजवळ महिलांनी एकत्र येत वटपौर्णिमा साजरी केली.