स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई; वाहनांसह २ कोटी ४६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
कुडाळ,दि.३० ऑगस्ट
सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत प्रतिबंधित व्हेल माशाच्या उलटीपासून (अंबरग्रीस) बनविलेल्या पदार्थाची तस्करी करणाऱ्या चौघांना ताब्यात घेतले. आरोपींकडून २ किलो ३७३ ग्रॅम वजनाचे अंबरग्रीस, अंदाजे किंमत २ कोटी ३७ लाख ३० हजार रुपये, तसेच गुन्ह्यात वापरलेली दोन वाहने असा एकूण २ कोटी ४६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
शनिवारी (२९ ऑगस्ट) सायंकाळी सुमारे ६.२० वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक कुडाळ पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना काही इसम प्रतिबंधित अंबरग्रीसची तस्करी करण्याच्या तयारीत असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन दोन पंच, वजनकाटाधारक व वनरक्षक यांच्या उपस्थितीत पणदूर ते कडावल जाणाऱ्या डांबरी रस्त्यालगत कुलस्वामिनी एंटरप्रायझेस बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या कार्यालयाजवळ सापळा रचण्यात आला.
या कारवाईदरम्यान काळ्या रंगाची होंडा युनिकॉर्न मोटारसायकल (एमएच ०७ एएन ५२९४) आणि ग्रे रंगाची मारुती सुझुकी एर्टिगा चारचाकी (एमएच ०७ एएस ३७४७) या वाहनांमधून आलेल्या चौघांना पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये संकेत संतोष चव्हाण (२६, रा. रवळनाथनगर, ओरोस, मूळ रा. निरुखे, ता. कुडाळ), महेश लक्ष्मण रेवणकर (३५, सध्या रा. कुवारबाव, रत्नागिरी, मूळ रा. रेवंडी, ता. मालवण), अमेय पुंडलिक देसाई (३१, रा. रवळनाथनगर, ओरोस, ता. कुडाळ) आणि अमित अरुण अणावकर (३९, रा. अणाव, ता. कुडाळ) यांचा समावेश आहे.
पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यात आरोपींकडे विक्रीच्या उद्देशाने २ किलो ३७३ ग्रॅम अंबरग्रीस ताब्यात असल्याचे आढळून आले. त्यानंतर अंबरग्रीस तसेच तस्करीसाठी वापरण्यात आलेली दोन्ही वाहने असा एकूण २ कोटी ४६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ मधील कलम ३९, ४२, ४३, ४४, ४८ आणि ५१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम आणि परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्या सूचनेनुसार, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, एएसआय सुरेश राठोड, हेड कॉन्स्टेबल विल्सन डिसोजा, आशीष जामदार आणि पोलीस कॉन्स्टेबल अमर कांडर सहभागी होते.