अबकारी विभागाची पहाटे मोठी कारवाई; ट्रकचालक फरार
बांदा,दि.२८ ऑगस्ट
गोव्याहून महाराष्ट्रात होणाऱ्या अवैध दारू वाहतुकीविरोधात पेडणे अबकारी विभागाने शुक्रवारी पहाटे मोठी कारवाई केली. पत्रादेवी येथील गोवा-महाराष्ट्र सीमेवरील चेकनाक्यावर MH 14 EM 8969 क्रमांकाचा ट्रक अडवून त्यातून मॅकडॉवेल दारूचे सुमारे ४०० बॉक्स जप्त करण्यात आले. कांद्याच्या पिशव्यांच्या आडून दारूची वाहतूक केली जात असल्याचे या कारवाईत उघड झाले. ही कारवाई २८ ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे दोन वाजता करण्यात आली. दरम्यान, ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला.
गोव्याहून महाराष्ट्राच्या दिशेने जाणाऱ्या संशयित ट्रकची अबकारी अधिकाऱ्यांनी पत्रादेवी चेकनाक्यावर तपासणी केली. ट्रकच्या पुढील भागात कांद्याच्या पिशव्या ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, अधिकाऱ्यांनी मागील भागाची कसून तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात दारूचे बॉक्स आढळून आले.

त्यानंतर ट्रक बाजूला घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ट्रकसह दारूसाठा ताब्यात घेण्यात आला. जप्त साठ्यामध्ये मॅकडॉवेल ब्रँडच्या १८० एमएल क्षमतेच्या बाटल्यांचे सुमारे ४०० बॉक्स असल्याचे समोर आले आहे. जप्त दारूसाठ्याची नेमकी किंमत पुढील तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
कारवाईची चाहूल लागताच ट्रकचालकाने घटनास्थळावरून पलायन केले. फरार चालकाचा शोध सुरू असून, दारूसाठा नेमका कोठे नेण्यात येत होता तसेच या तस्करीमागे कोणाचा सहभाग आहे, याचा तपास अबकारी विभाग करीत आहे.
अबकारी निरीक्षक सलील वळवयकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी विक्रांत कोरगावकर, निलेश गावडे, उदय गवस, सुनील कोरबोटकर, शाहू पावणे, अनिल गावकर आणि विठोबा नाईक यांच्यासह अबकारी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
पत्रादेवी चेकनाक्यावर झालेल्या या कारवाईमुळे गोव्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या अवैध दारू वाहतुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.