बांदा : इन्सुलीतील तरुणीच्या मृत्यूला संशयाचे गूढ; सीआयडी चौकशीच्या मागणीने प्रकरण पुन्हा चर्चेत

शेअर करा

जि.प. सदस्य नितीन राऊळ यांचे पोलिसांना निवेदन; मोबाईल कोल्हापूरला तपासणीसाठी

बांदा,दि.२७ जुलै
इन्सुली-कोठावळेबांध येथील २५ वर्षीय सोनाली प्रभाकर गावडे हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने पुन्हा एकदा गंभीर वळण घेतले आहे. मृत्यूची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, तसेच या प्रकरणाचा तपास सीआयडी मार्फत करण्यात यावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांनी बांदा पोलिसांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, मृत तरुणीच्या कुटुंबीयांनीही हा मृत्यू अपघाती नसून घातपात असल्याचा गंभीर आरोप करत स्वतंत्र अर्ज सादर केला आहे.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, 8 जुलै 2025 रोजी सकाळी सोनाली घरातून कामासाठी निघाली होती. संध्याकाळपर्यंत ती घरी परतली नसल्याने शोधाशोध सुरू करण्यात आली. दुसऱ्या दिवशी सकाळी घरापासून काही अंतरावरील पाण्याच्या पाटात एक फूट पाण्यात तिचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली असली, तरी पोस्टमार्टममध्ये पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
मात्र, सोनालीचा मृत्यू नैसर्गिक किंवा अपघाती नसून तिचा घातपात करून पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह पाण्यात टाकण्यात आल्याचा ठाम संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबीयांचे जबाब पुन्हा नोंदवून या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात यावा, अशी मागणी नितीन राऊळ यांनी केली आहे.
याबाबत बांदा सहायक पोलिस निरीक्षक पंकज शिंदे यांनी सांगितले की, सोनाली गावडे हिचा मोबाईल कोल्हापूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला जाईल. कुणावर संशय असल्यास त्याची माहिती द्यावी. मयताला न्याय मिळालाच पाहिजे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ, कास सरपंच प्रवीण पंडित, पंचायत समिती सदस्य सदा राणे, तसेच कुटुंबीय अरुण गावडे, आदेश गावडे, अनामिका गावडे आणि रामचंद्र नाईक उपस्थित होते.
प्रकरणातील नव्या घडामोडींमुळे सोनाली गावडेच्या मृत्यूमागील सत्य नेमके काय, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले असून, सीआयडी चौकशीच्या मागणीमुळे या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

शेअर करा