बांदा,दि.२६ ऑगस्ट
न्हावेली ते आरोस-दांडेली रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी कापण्याच्या कामात निकृष्ट दर्जा होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. संबंधित ठेकेदाराकडून रस्त्याच्या कडेची झाडे अयोग्य पद्धतीने कापली जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आरोस, दांडेली व न्हावेली येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
यावेळी दांडेलीचे माजी सरपंच दादा पालयेकर, न्हावेलीचे माजी उपसरपंच विठोबा गावडे, दुर्गेश मोरजकर, संदीप माणगावकर, ओंकार नाईक, हनुमंत पटेकर, गौरेश पाटकर, सिद्धेश आरमारकर तसेच न्हावेली ग्रामपंचायत सदस्य सागर धाऊसकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामस्थांनी या प्रकाराची माहिती पंचायत समिती सदस्य शरद धाऊसकर यांच्या निदर्शनास आणून दिली. धाऊसकर यांनी तातडीने दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी श्री. पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर श्री. पाटील यांनी सहकाऱ्यांसह प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी केली.
ग्रामस्थांच्या मागणीनुसार रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना तसेच एसटी प्रवाशांना कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, अशा पद्धतीने दर्जेदार काम करण्यात येईल, अशी ग्वाही श्री. पाटील यांनी दिली. कामावर देखरेख ठेवण्यासाठी शासकीय पर्यवेक्षक नियुक्त करण्याचे आश्वासनही देण्यात आले.