देवगड : मुलांच्या गुणवत्तावाढीसाठी घरातील वातावरण महत्त्वाचे – अॅड. अजितराव गोगटे

शेअर करा

नियमित अभ्यास, पालकांचा संवाद आणि सकारात्मक प्रोत्साहन यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते, असे प्रतिपादन माजी आमदार अॅड. अजितराव गोगटे यांनी केले.

देवगड ,दि.२८ जुलै
मुलांच्या गुणवत्तावाढीसाठी घरी अभ्यासाचे योग्य वातावरण, नियमित संवाद आणि सकारात्मक प्रोत्साहन देणे तितकेच आवश्यक आहे.असे प्रतिपादन माजी आमदार अॅड.अजितराव गोगटे यांनी केले.

 जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेत शाळा व्यवस्थापन समितीने आयोजित केलेल्या शिक्षक-पालक सभेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

याप्रसंगी विचारमंचावर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. मुकेश पारकर , शाला समितीचे अध्यक्ष श्री. प्रसाद मोंडकर, प्राथमिक विभागाचे अध्यक्ष ॲड. अभिषेक गोगटे, सौ.आईर , श्रीमती नम्रता तावडे तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. सुनील जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

  यावेळी मार्गदर्शन करताना संस्थाध्यक्ष ॲड. अजितराव गोगटे म्हणाले,“विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याची जबाबदारी केवळ शाळेची नसून पालक आणि शिक्षक यांची संयुक्त जबाबदारी आहे. मुलांच्या गुणवत्तावाढीसाठी घरी अभ्यासाचे योग्य वातावरण, नियमित संवाद आणि सकारात्मक प्रोत्साहन देणे तितकेच आवश्यक आहे. विद्या विकास मंडळ विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत अत्याधुनिक भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. आधुनिक प्रयोगशाळा, डिजिटल शिक्षण, सुसज्ज वर्गखोल्या, क्रीडा व कौशल्य विकासासाठी आवश्यक सुविधा उभारण्याचे काम संस्थेमार्फत सुरू असून त्याचा विद्यार्थ्यांना निश्चितच लाभ होईल.”असे सांगितले.

  कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. सुनील जाधव यांनी केले. त्यांनी विद्यालयातील शैक्षणिक प्रगती, विविध उपक्रम, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना तसेच शिक्षक-पालक संवादाचे महत्त्व स्पष्ट केले. 

प्राथमिक विभागाचे अध्यक्ष ॲड. अभिषेक गोगटे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले, “शिक्षक आणि पालक यांच्यातील सातत्यपूर्ण संवाद ही विद्यार्थ्यांच्या यशाची गुरुकिल्ली आहे. प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याच्या शिक्षणात सक्रिय सहभाग घेतला, तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत निश्चितच लक्षणीय वाढ होईल.”

शाला समितीचे अध्यक्ष श्री. प्रसाद मोंडकर म्हणाले, “विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार, शिस्त, वेळेचे नियोजन आणि अभ्यासाची आवड निर्माण करण्यासाठी पालकांनी मुलांना पुरेसा वेळ देणे आवश्यक आहे. शाळा आणि पालक यांचे सुसंवादातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साध्य होऊ शकतो.”

सभेत उपस्थित पालकांनी विविध सूचना मांडल्या तसेच विद्यालयाच्या शैक्षणिक व विकासात्मक कार्याबद्दल समाधान व्यक्त करून संस्थेच्या उपक्रमांना सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

 सभेच्या प्रारंभी अलीकडेच दिवंगत झालेल्या व्यक्तिमत्वांच्या प्रती भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.कार्यक्रमाचे स्वागत , सूत्रसंचालन व आभार जेष्ठ शिक्षक श्री.संजय पांचाळ यांनी केले.

कार्यक्रमास शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि विधायक वातावरणात संपन्न झाला.

शेअर करा