देवगड : मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदण -रस्ते समितीची देवगडमध्ये बैठक; ४१ रस्त्यांच्या कामांना गती देण्यावर चर्चा

शेअर करा

पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना योजनेचा जास्तीत जास्त लाभ देण्याचा प्रयत्न

देवगड,दि.२८ ऑगस्ट

पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली शासनाची महत्त्वाकांक्षी रस्ते-पांदण योजना गतिमान पद्धतीने राबवून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी रस्ते-पांदण समिती विधानसभा कणकवली मतदारसंघाची बैठक समितीचे अध्यक्ष मिलिंद मेस्त्री आणि सह -अध्यक्ष संदीप साटम यांच्या अध्यक्षतेखाली देवगड तहसील कार्यालयात पार पडली. या बैठकीची माहिती समितीचे सहअध्यक्ष संदीप साटम यांनी दिली.

या बैठकीला समितीचे अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, सह अध्यक्ष,संदीप साटम, सदस्य जनार्दन तेली, विद्याधर जोशी यांच्यासह सरपंच तसेच प्रांताधिकारी जगदीश कातकर, देवगड तहसीलदार शितल जाधव , पंचायत समिती, महावितरण, भूमी अभिलेख आणि अन्य संबंधित शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

कणकवली विधानसभा मतदारसंघातील रस्ते-पांदण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. कणकवली तालुक्यातील निकषांमध्ये बसणाऱ्या ४१ रस्त्यांच्या यादीचे वाचन करण्यात आले. या रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही आणि पुढील नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली.

गावांमध्ये पारंपरिक पद्धतीने वापरात असलेल्या वाटा व पांदण रस्त्यांचा विकास होणे गरजेचे असल्याचे बैठकीत मांडण्यात आले. या दृष्टीने पुढील काळात समितीच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत. रस्ते-पांदण योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून काम करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

शेअर करा