देवगड स्पोर्ट्स क्लबच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट

शेअर करा

देवगड, दि. १५ ऑगस्ट

देवगड स्पोर्ट्स क्लबच्या स्थापनेनंतर प्रथमच स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून देवगड स्पोर्ट्स क्लबच्या सदस्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री मा. नितेशजी राणे यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी क्लबच्या सदस्यांनी देवगड स्पोर्ट्स क्लबची स्थापना, क्लबची मुख्य उद्दिष्टे तसेच भविष्यात राबविण्यात येणाऱ्या विविध क्रीडा आणि सामाजिक उपक्रमांची माहिती पालकमंत्री राणे यांना दिली.


तसेच, येत्या ३० ऑगस्ट रोजी देवगड-मिठमुंबरी समुद्रकिनारी आयोजित करण्यात आलेल्या देवगड स्पोर्ट्स क्लबच्या ‘ फिशींग कॅाम्पिटीशन’ या पहिल्याच उपक्रमासाठी मा. नितेशजी राणे यांना निमंत्रित करण्यात आले.


यावेळी पालकमंत्री राणे यांनी देवगड स्पोर्ट्स क्लबच्या उपक्रमांचे कौतुक करत क्लबच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, युवकांनी क्रीडा क्षेत्रात अधिक सक्रिय होऊन समाजहिताचे उपक्रम राबवावेत, असे मार्गदर्शनही त्यांनी केले.
देवगड परिसरातील युवकांना एकत्र आणून क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी देवगड स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी क्लबच्या सदस्यांनी दिली.

शेअर करा