देवगड: गुरांच्या मालकी हक्कावरून वाद; नातवाने आजी-आजोबांवर कोयत्याने हल्ला

शेअर करा

दहिबांवमध्ये ८४ वर्षीय आजोबा व ७० वर्षीय आजी गंभीर जखमी; मुख्य संशयित अक्षय बांवकरला अटक, दोन दिवसांची पोलीस कोठडी

देवगड,दि. १८ ऑगस्ट

गुरांच्या मालकी हक्कावरून वाद करून नातवाने आपल्या आजी-आजोबांवर कोयत्याने हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.गाईचे दुध काढत असताना आजोबांच्या डोक्यावर कोयत्याने सपासप वार केले.या प्राणघातक हल्ल्यामध्ये आजोबा मधुकर रामजी बांवकर(84) हे व त्यांना सोडविण्यासाठी पुढे सरसावलेली त्यांची पत्नी आनंदी मधुकर बांवकर(70) रा.दहिबांव बांवकरवाडी ही दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जामसंडे येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.ही घटना 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.30 वा.सुमारास दहिबांव बांवकरवाडी येथे घडली.दरम्यान या घटनेतील मुख्य संशयित अक्षय चंद्रकांत बांवकर(32) रा.दहिबांव बांवकरवाडी याला देवगड पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली.मंगळवारी त्याला देवगड न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.30 वा.सुमारास मधुकर बांवकर हे राहत्या घरातील देवघराच्या बाजूस गाईचे दुध काढत असताना त्यांचा चुलत नातू संशयित अक्षय बांवकर हा तेथे आला. गुरांच्या मालकीवरून व गाईचे दुध काढण्याचा रागातून संशयिताने मधुकर बांवकर यांना जीवे ठार मारण्याचा उद्देशाने त्यांचा डोक्यात कोयत्याने सपासप वार करून व लाकडाने मारहाण करून त्यांना गंभीर दुखापत केली.ही घटना लक्षात येताच मधुकर बांवकर यांच्या पत्नी आनंदी या पतीला वाचविण्यासाठी पुढे सरसावल्या.यावेळी संशयिताने त्या दोघांनाही शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली तसेच आनंदी यांच्या डोक्यावर व डाव्या हातांच्या बोटावर संशयिताने कोयत्याने वार करून गंभीर दुखापत केली.यावेळी आनंदी यांचा पुतण्या चंद्रकांत विठ्ठल बांवकर हा त्यांना सोडविण्यासाठी आला असता संशयित हा त्यांचा अंगावरही मारण्यासाठी धावून गेला.या घटनेची फिर्याद आनंदी बांवकर यांनी देवगड पोलिस स्थानकात दिली असून संशयित अक्षय बांवकर याच्याविरूध्द भारतीय न्याय संहीता कलम 109(1), 118(2), 131, 351(2)(3) ,352 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान या घटनेतील गंभीर जखमी मधुकर बांवकर व त्यांची पत्नी आनंदी बांवकर यांना तात्काळ देवगड ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.तेथे प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी त्यांना जामसंडे येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.या घटनेचा गुन्हा दाखल होताच देवगड पोलिसांनी संशयित अक्षय बांवकर याला तात्काळ अटक करून मंगळवारी देवगड न्यायालयासमोर हजर केले.न्यायालयाने संशयिताला दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.अप्पर जिल्हा पोलिस अधिक्षक नयोमी साटम यांनीही घटनास्थळी भेट देवून देवगड पोलिसांना या घटनेच्या सखोल तपास करण्याबाबत सुचना केल्या.या घटनेचा अधिक तपास देवगड पोलिस निरिक्षक श्याम बुवा करीत आहेत.

शेअर करा