देवगड : श्रावणी सोमवारनिमित्त कुणकेश्वरात प्रथम पूजेचा मान मान्यवरांना

शेअर करा

जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती; भाविकांच्या सोयीसाठी देवस्थान ट्रस्ट सज्ज

देवगड,दि.३० ऑगस्ट

कोकणची काशी म्हणून जगभरात ख्याती असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरात उद्या, सोमवार दि. 31 ऑगस्ट रोजी श्रावणी सोमवारनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त मंदिरातील प्रथम पूजेचा मान विविध क्षेत्रातील मान्यवरांना मिळणार असून त्यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा संपन्न होणार आहे.

या प्रथम पूजेसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. मोहन दहिकर, पुणे येथील उद्योगपती श्री. राहुल शेवाळे, महाराष्ट्र मंडप डेकोरेटर्स असोसिएशनचे कोल्हापूर अध्यक्ष श्री. सागर चव्हाण, कणकवली नगराध्यक्ष श्री. संदेश पारकर, देवस्थान कायदेविषयक सल्लागार अॅड. श्री. प्रवीण कदम तसेच कणकवलीचे उद्योजक श्री. ए. पी. सावंत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

श्रावणी सोमवारनिमित्त कुणकेश्वर मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे. भाविकांना दर्शन घेताना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टकडून आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मंडपाची उभारणी करण्यात आली असून गर्दीचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठीही नियोजन करण्यात आले आहे.

भाविकांना सुरक्षित व सुरळीत दर्शन घेता यावे, यासाठी देवस्थान ट्रस्ट सज्ज असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली यांनी दिली. श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांनी मोठ्या संख्येने कुणकेश्वर येथे उपस्थित राहून भगवान कुणकेश्वराचे दर्शन घ्यावे, असे आवाहनही देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा