देवगड : एक राखी जवानांसाठी : चिमुकल्या हातांनी वीर जवानांसाठी प्रेमाचा धागा!

शेअर करा

देवगड,दि.२५ ऑगस्ट

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी वाडा मुळबांध, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग येथे २२ ऑगस्ट २०२६ रोजी “एक राखी जवानांसाठी” या अभिनव उपक्रमांतर्गत राखी तयार करण्याची कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
देशाच्या रक्षणासाठी सीमेवर अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने इयत्ता पहिली ते चौथीचे सर्व विद्यार्थी तसेच अंगणवाडीतील चिमुकल्यांनी स्वतःच्या हाताने सुंदर व आकर्षक राख्या तयार केल्या.
या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने राख्या तयार करताना देशप्रेम, जवानांप्रती आदर, बंधुभाव, सामाजिक बांधिलकी आणि सर्जनशीलता या मूल्यांचा अनुभव घेतला. चिमुकल्या हातांनी तयार झालेली प्रत्येक राखी ही जवानांसाठी प्रेम, कृतज्ञता आणि शुभेच्छांचा संदेश घेऊन जाणारी आहे.
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या भारतीय पोस्ट खात्याच्या माध्यमातून वीर जवानांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत. देशाच्या रक्षणासाठी दूर सीमेवर तैनात असलेल्या जवानांच्या मनगटावर आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेली राखी बांधली जावी, हीच या उपक्रमामागील सुंदर भावना आहे.
या कार्यशाळेला शाळेचे मुख्याध्यापक नवनाथ चौगले, अंगणवाडी सेविका अपर्णा जोशी, अंगणवाडी मदतनीस रवीना जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शशांक तावडे व उपाध्यक्ष सिद्धी जाधव यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

या उपक्रमात शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच पालकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सहभागी पालकांमध्ये पूजा तावडे, मिताली लासे, दिपाली बांदिवडेकर, लक्ष्मी जाधव, सतीश जाधव, रुपेश जाधव, दीक्षा गुरव आणि निकिता जाधव यांचा सहभाग लाभला.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या मनात “देशासाठी आपणही काहीतरी करू शकतो” ही भावना रुजविण्याचा सुंदर प्रयत्न झाला. चिमुकल्या हातांनी तयार केलेली ही राखी म्हणजे केवळ रक्षाबंधनाचा धागा नसून भारतभूमीचे रक्षण करणाऱ्या वीर जवानांप्रती प्रेम, आदर आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करणारा विश्वासाचा धागा आहे.

शेअर करा