वयाच्या ५१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; कला आणि क्रीडा क्षेत्रातून हळहळ व्यक्त
देवगड,दि.०३ नोव्हेंबर
देवगड तालुक्यातील हिंदळे-मोर्वे येथील रहिवासी तथा प्रसिद्ध दशावतार नाट्य कलाकार, उत्कृष्ट व्हॉलीबॉल व क्रिकेटपटू दिनेश यशवंत मोर्वेकर (वय ५१) यांचे शनिवारी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने कला आणि क्रीडा क्षेत्रात तसेच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
अष्टपैलू व मनमिळाऊ व्यक्तित्व:
दिनेश मोर्वेकर हे केवळ एक उत्तम दशावतार नाट्य कलाकार आणि व्हॉलीबॉल-क्रिकेटपटूच नव्हे, तर त्यांना संगीताचीही विशेष आवड होती. ते एक निस्सीम विठ्ठल भक्त आणि मृदुंगमणी होते. त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळाऊ होता. ते सर्वांशी नेहमी प्रेमाने वागत असत आणि नेहमीच मानवी मूल्य व माणुसकी जपणारे एक आदर्श व्यक्तित्व म्हणून त्यांची परिसरात ओळख होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश मोर्वेकर यांना सुमारे दोन वर्षांपूर्वी हृदयविकाराचा त्रास झाला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती वारंवार बिघडत असे. शनिवारी दुपारी त्यांची प्रकृती अचानक अधिक खालावल्याने त्यांना उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता, उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. या घटनेची फिर्याद अरुण सदाशिव मोर्वेकर (वय ६६, रा. मोर्वे हिंदळे) यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली असून, पुढील तपास महिला पोलीस हवालदार विनीता भुजे करीत आहेत.
त्यांच्या अकाली निधनाने हिंदळे-मोर्वे परिसरात व त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, बहीण, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.