टक्केवारीसाठी टेंडर मॅनेज करणाऱ्यांनी माझ्यावर टीका करण्यापेक्षा जनतेचे प्रश्न सोडवावेत ; माजी आ.वैभव नाईक यांची टीका
कणकवली,दि.०३ नोव्हेंबर
पिंगुळी येथील पाझर तलावाचा प्रश्न गंभीर असून, ग्रामस्थांच्या भावनांचा आदर करून आमदार निलेश राणे यांनी हा प्रश्न तातडीने सोडवावा. माझ्यावर टीका करण्यापेक्षा टक्केवारीसाठी टेंडर मॅनेज करण्याच्या राजकारणातून बाहेर पडून जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे, असा जोरदार टोला माजी आमदार तथा ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी लगावला.
पिंगुळी येथील पाझर तलाव वाचविण्यासाठी ग्रामस्थांनी कुडाळ तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला वैभव नाईक यांनी पाठिंबा दिला होता. यावेळी त्यांनी आमदार निलेश राणे यांच्यावर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना निलेश राणे यांनी ‘ब्लॅकमेलिंगचे राजकारण खपवून घेणार नाही,’ असा इशारा दिला होता. त्यावर वैभव नाईक यांनी पुन्हा पलटवार केला.
जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर यांच्यावर टीका करण्याऐवजी आमदार निलेश राणे यांनी पिंगुळीतील ग्रामस्थांची भूमिका समजून घ्यायला हवी होती. पाझर तलाव वाचविण्यासाठी सडवेलकर आणि ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले असून, त्यांचा लढा तलाव गिळंकृत करू पाहणाऱ्या खासगी ठेकेदाराविरोधात आहे. त्यामुळे या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदारांनी ग्रामस्थांना न्याय मिळवून द्यावा, असे नाईक म्हणाले.
सध्या मी आमदार नाही. विधानसभा निवडणुकीत कुडाळ-मालवण मतदारसंघातून माझा निसटत्या मतांनी पराभव झाला आणि तो मी मान्य केला आहे. मात्र, आमदार निलेश राणे यांनाही लोकसभा निवडणुकीत दोन वेळा मोठ्या मताधिक्याने पराभव स्वीकारावा लागला होता. विधानसभा निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी साथ दिली नसती, तर तुमचाही पराभव झाला असता, हे लक्षात घ्यावे. माझे कुटुंब मी स्वतःच्या हिमतीवर चालवले; मात्र तुम्ही तुमचे कुटुंब खासदार नारायण राणे यांच्या आधारावर चालवता, याचाही विचार करावा, अशी टीका नाईक यांनी केली.
मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेचाही नाईक यांनी उल्लेख केला. पुतळ्याचे काम भ्रष्टाचारामुळे आणि निकृष्ट दर्जामुळे झाले, असा आरोप करत पुतळा कोसळण्याचा तसेच पिंगुळीतील पाझर तलावाचा प्रश्न यांवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
आमदार निलेश राणे हे सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे त्यांनी टीका-प्रत्युत्तराच्या राजकारणात न अडकता जनतेचे प्रश्न ताकदीने सोडविण्यास प्राधान्य द्यावे, असा सल्लाही वैभव नाईक यांनी दिला.