Sawantwadi News:सावंतवाडी बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्ध महिलेची ७५ हजारांची सोन्याची पाटली चोरीला

शेअर करा

७२ वर्षीय महिलेच्या हातातील सोन्याची पाटली चोरट्याने केली लंपास; महिलेची पोलिसांत तक्रार दाखल

सावंतवाडी,दि.०३ नोव्हेंबर

सावंतवाडी बसस्थानकावर प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत एका ७२ वर्षीय वृद्ध महिलेच्या हातातील सुमारे ७५ हजार रुपये किमतीची सोन्याची पाटली चोरीला गेल्याची धक्कादायक घटना आज दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी पीडित महिलेने पोलिसात कायदेशीर तक्रार दाखल केली आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वृद्ध महिला तब्येतीच्या कारणास्तव सावंतवाडीतील सिद्धिविनायक ऑर्थोपेडिक हॉस्पिटल येथे उपचारासाठी आली होती. उपचार घेतल्यानंतर ती घरी परतण्यासाठी सावंतवाडी बसस्थानकावर पोहोचली. दुपारच्या सुमारास सावंतवाडी-शिरोडा बसमध्ये चढताना प्रवाशांची मोठी गर्दी होती.
​याच गर्दीचा फायदा घेत पीडित महिलेच्या पाठीमागे असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने तिच्या उजव्या हातातील सोन्याची पाटली अलगद काढून घेतली. सुमारे १५ ग्रॅम वजनाची आणि ७५ हजार रुपये किमतीची ही सोन्याची पाटली चोरीला गेल्याचे लक्षात येताच महिलेने आरडाओरडा केला.
​महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरडाओरडा केल्यानंतर पाठीमागील अनोळखी पुरुष आणि त्याच्या समोर असलेली अनोळखी महिला तात्काळ बसमधून उतरून पळून गेले. त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला; मात्र गर्दी आणि धावपळीमुळे ते दोघेही पळून जाण्यात यशस्वी झाले. याप्रकरणी संबंधित वृद्ध महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून पुढील तपास करत आहेत.

शेअर करा