Kudal Crime :कुडाळमध्ये वन्यप्राण्यांच्या अवयव तस्करीचा पर्दाफाश; तिघे आरोपी जेरबंद

शेअर करा

सावंतवाडी वनविभागाची काळप नाका परिसरात कारवाई; वाघ व बिबट्याचे दात आणि नखे जप्त

कुडाळ,दि.०३ नोव्हेंबर

वन्यप्राण्यांच्या अवयवांची बेकायदेशीर विक्री आणि तस्करी करणाऱ्या रॅकेटचा सावंतवाडी वनविभागाने दणकेबाज कारवाई करत पर्दाफाश केला आहे. कुडाळ बसस्थानक परिसर (काळप नाका) येथे रचलेल्या सापळ्यात तीन आरोपींना रंगेहात पकडण्यात आले असून, त्यांच्याकडून वाघ आणि बिबट्याचे दात व नखे असा किमती मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ यांना २ नोव्हेंबर २०२६ रोजी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सहाय्यक वनसंरक्षक आणि कुडाळ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई आखली.
एसटी महामंडळाच्या बसस्थानकात शिपाई म्हणून कार्यरत असलेला आरोपी क्र. १ रोहितदास हरिश्चंद्र कामत (वय ४८) याने बनावट ग्राहक बनून आलेल्या वनअधिकाऱ्यांना पैशाच्या लोभापोटी प्रथम वेंगुर्ला बसस्थानकावर बोलावून घेतले. तेथे १२ वाघनखांच्या विक्रीसाठी तब्बल २ लाख ५० हजार रुपयांचा व्यवहार ठरवण्यात आला. त्यानंतर कुडाळ बस डेपो येथे वाघनखे घेऊन एक इसम येईल असे सांगण्यात आले.
वनअधिकाऱ्यांच्या पथकाने कुडाळ काळप नाका येथील बस डेपो प्रवेशद्वारावर सापळा रचला. आरोपी क्र. १ याने आरोपी क्र. ३ याला आरोपी क्र. २ च्या माध्यमातून वाघनखे दाखवण्यासाठी पाठवले. व्यवहाराची बोलणी सुरू असतानाच दबा धरून बसलेल्या वनअधिकाऱ्यांनी तिन्ही आरोपींवर झडप घालून त्यांना ताब्यात घेतले.
यावेळी आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे वन्यप्राणी वाघाचा दातसुळा (नग १, लांबी ५ सेमी), वन्यप्राणी बिबट्याची नखे (नग २, लांबी ४ सेमी), सोन्यामध्ये मढवलेले सुळेदात (नग २, लांबी २ सेमी)
हा मुद्देमाल वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या अनुसूची १ अंतर्गत संरक्षण प्राप्त वन्यप्राण्यांची बेकायदेशीर शिकार करून विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याचे निष्पन्न झाले आहे.
नेरुर तर्फ हवेलीच्या वनपालांनी याप्रकरणी प्रथम गुन्हा नोंद (प्र.गु.रि. ०३/२०२६) दाखल केला आहे. आरोपींना कुडाळ येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपी क्र. १ व २ यांना २ दिवसांची वनकोठडी आणि आरोपी क्र. ३ याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
उपवनसंरक्षक मिलीश शर्मा व अतिरिक्त कार्यभार उपवनसंरक्षक किरण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली, डॉ. सुनील लाड यांच्या नेतृत्वात कुडाळ वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन पाटील, वनपाल संजय हजारे (मठ), वनपाल सूर्यकांत सावंत (नेरुर त. हवेली), गौरेश राणे, वनरक्षक अतुल खोत (धामापूर), ब्रह्मकुमार भोजने (तुळस), अनिकेत माने (माणगाव), समीर खरवत (नेरुर), प्रवीण कमळकर (मठ) आणि चालक राहुल मयेकर यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.

शेअर करा