नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या प्रयत्नांना यश; पालकमंत्री नितेश राणे , जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे संदेश पारकर यांनी मानले आभार
कणकवली,दि.०३ नोव्हेंबर
कणकवली शहरातील भाजी मार्केटच्या विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल पुढे पडले आहे. कणकवली नगरपंचायत हद्दीतील आरक्षण क्रमांक ५ मधील प्रस्तावित भाजी मार्केटसाठी आवश्यक जागा संपादित करण्याकरिता जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ अंतर्गत तब्बल १९ लाख ४३१ रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या काही काळापासून प्रलंबित असलेल्या भाजी मार्केटच्या जागा संपादन प्रक्रियेला आता गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.पालकमंत्री नितेश राणे , जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी आभार मानले आहेत.
या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे कणकवली शहरातील भाजी विक्रेते आणि नागरिकांना भविष्यात अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.
जिल्हा नियोजन समिती तथा जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्याकडून ३० ऑक्टोबर २०२६ रोजी याबाबत प्रशासकीय मान्यता आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार कणकवली नगरपंचायत हद्दीतील आरक्षण क्रमांक ५ मधील भाजी मार्केटसाठी आवश्यक जागा संपादित करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
संबंधित जागा सर्व्हे क्रमांक १८८/ब मध्ये असून, या सर्व्हेतील एकूण ०.०८.०० हेक्टर क्षेत्रापैकी ०.०३.१५ हेक्टर क्षेत्र भाजी मार्केट विकसित करण्यासाठी संपादित करण्याचे प्रस्तावित आहे. या जागेच्या संपादनासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधीची तरतूद करण्यात आली आहे.
शासनाचा १७.१० लाखांचा निधी,नगरपंचायतीचाही सहभाग!
या प्रकल्पासाठी एकूण १९ लाख ४३१ रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये शासनाचा हिस्सा १७ लाख १० हजार रुपये, तर स्थानिक स्वराज्य संस्थेचा हिस्सा १ लाख ९० हजार ४३१ रुपये असा आहे. जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ अंतर्गत हा निधी उपलब्ध होणार आहे.
या प्रस्तावाला जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर विकास शाखेच्या माध्यमातून मंजुरीसाठी सादर करण्यात आले होते. त्यानंतर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मात्र, प्रत्यक्ष काम सुरू करण्यापूर्वी नियमानुसार जागा संपादन, तांत्रिक मान्यता, अंदाजपत्रक आणि इतर आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण कराव्या लागणार आहेत.