देवगड स्पोर्ट्स क्लबतर्फे ३० ऑगस्टला तालुक्यातील पहिली फिशिंग टूर्नामेंट

शेअर करा

मुंबरी बीचवर रंगणार रोमांचक स्पर्धा; कोकण, गोवा, कर्नाटकातील नामांकित स्पर्धकांचा सहभाग

देवगड,दि.२८ ऑगस्ट

देवगड स्पोर्ट्स क्लबची स्थापना ७ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आली असून, क्लबच्या पहिल्या स्पोर्टिंग इव्हेंटअंतर्गत देवगड तालुक्यातील पहिल्या फिशिंग टूर्नामेंटचे आयोजन ३० ऑगस्ट २०२६ रोजी मुंबरी बीच येथे करण्यात आले आहे. सकाळी ७.३० वाजता या स्पर्धेचा शुभारंभ होणार असून दुपारी २ वाजता स्पर्धेची सांगता होऊन विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे.

देवगडच्या समुद्राशी आणि स्थानिक जीवनाशी मासेमारीचे अतूट नाते आहे. याच पार्श्वभूमीवर युवकांना समुद्राशी जोडणाऱ्या तसेच साहसी आणि क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमाला सुरुवात करण्याच्या उद्देशाने देवगड स्पोर्ट्स क्लबने या फिशिंग टूर्नामेंटचे आयोजन केले आहे. कोकण, कर्नाटक आणि गोवा येथील सुमारे ३० नामांकित स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होणार असल्याने स्पर्धेला चांगलीच रंगत येण्याची शक्यता आहे.

या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी ११,१११ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ७,७७७ रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ३,३३३ रुपये अशी रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. ही प्रमुख पारितोषिके पकडलेल्या माशाच्या वजनावर आधारित असतील. याशिवाय दीड हजार रुपयांची तीन कन्सोलेशन पारितोषिके देण्यात येणार आहेत.

स्पर्धेदरम्यान सर्वात आधी मासा पकडणाऱ्या स्पर्धकाला मॅक्सिमम कॅचअंतर्गत विशेष पारितोषिक, तसेच दुपारी २ वाजेपर्यंत सर्वात शेवटी मासा पकडणाऱ्या स्पर्धकालाही कन्सोलेशन प्राईज देण्यात येणार आहे. याशिवाय सर्वाधिक संख्येने मासे पकडणाऱ्या स्पर्धकालाही विशेष पारितोषिक देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

देवगड स्पोर्ट्स क्लबचा हा केवळ स्पर्धेपुरता उपक्रम नसून, युवा वर्गाने अमली पदार्थ, दारू व इतर व्यसनांपासून दूर राहून क्रीडा आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, हा व्यापक संदेश या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आहे. युवकांना एकत्र आणून देवगडमध्ये चांगली स्पोर्टिंग कम्युनिटी निर्माण करण्याचा क्लबचा मानस आहे.

या उपक्रमामुळे कोणत्याही व्यक्तीच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत तसेच समुद्रातील जीवसृष्टीला कोणतीही हानी पोहोचणार नाही, याचीही आयोजकांकडून विशेष काळजी घेतली जाणार आहे.

देवगड तालुक्यात पहिल्यांदाच आयोजित करण्यात येत असलेल्या या फिशिंग टूर्नामेंटला तालुक्यातील नागरिकांनी तसेच विशेषतः युवा वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन देवगड स्पोर्ट्स क्लबच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा