मोबाईल नेटवर्क नसलेल्या गावात चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर डॉ. माधव घोगरे यांची यशस्वी ‘सी-सेक्शन’ शस्त्रक्रिया
देवगड ,दि.२१ जुलै
देवगड तालुक्यातील अतिदुर्गम आणि शेवटच्या टोकावरील कुंकवण गावात पशुवैद्यकीय विभागाने वेळेवर दाखविलेल्या तत्परतेमुळे गाईसह तिच्या पोटातील साहिवाल जातीच्या वासराचा जीव वाचविण्यात यश आले. मोबाईल नेटवर्कची सुविधा नसलेल्या या गावात अत्यंत गुंतागुंतीची प्रसूती यशस्वीपणे हाताळत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. माधव घोगरे यांनी ‘सी-सेक्शन’ शस्त्रक्रिया करून जिवंत वासरू सुखरूप बाहेर काढले.
कुंकवण ( धालवली व्हीसी अंतर्गत ) येथे एका गाईची प्रसूती अडचणीत आली होती. तपासणीदरम्यान गाईच्या पोटातील वासराची मान तब्बल ३६० अंशांनी फिरल्याचे निदर्शनास आले. ही अत्यंत गंभीर आणि दुर्मीळ परिस्थिती असल्याने तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सकाळी ६ ते १०.३० या कालावधीत जवळपास साडेचार तास चाललेल्या या शस्त्रक्रियेदरम्यान डॉ. माधव घोगरे यांनी अत्यंत कौशल्याने ‘सी-सेक्शन’ करून गाईच्या पोटातून कृत्रिम रेतन (Artificial Insemination – AI) सेवेद्वारे गर्भधारणा झालेल्या साहिवाल जातीच्या जिवंत वासराला सुरक्षित बाहेर काढले. शस्त्रक्रियेनंतर गाय आणि वासरू दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली.
विशेष म्हणजे, ज्या कुंकवण गावात ही शस्त्रक्रिया पार पडली ते गाव अत्यंत दुर्गम असून तेथे मोबाईल नेटवर्कचीही सुविधा उपलब्ध नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीतही पशुवैद्यकीय विभागाने घटनास्थळी पोहोचून तत्पर सेवा देत शेतकऱ्याला मोठा दिलासा दिला.
या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे पशुवैद्यकीय विभागाची कार्यक्षमता आणि ग्रामीण भागातील पशुधन वाचविण्याची बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून, डॉ. माधव घोगरे यांच्या कार्याचे शेतकरी व ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
शेतकरी श्रीराम विठ्ठल ठाकूरदेसाई यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. माधव घोगरे यांच्या तत्पर सेवेबद्दल समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले.