दोडामार्ग : घोटगेवाडी दुर्घटनेनंतर तिसऱ्या दिवशीही शोधमोहीम सुरूच!युवक अजूनही बेपत्ता.

शेअर करा

दोडामार्ग,दि. १९ ऑगस्ट

घोटगेवाडी कॉजवे परिसरात तिलारी नदीच्या वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या ६ वर्षीय चिमुरड्याचा मृतदेह काल शोधमोहीमेदरम्यान सापडला. मात्र, या दुर्घटनेतील २९ वर्षीय युवक अद्यापही बेपत्ता असून, त्याचा शोध घेण्यासाठी आज तिसऱ्या दिवशीही युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे.

बेपत्ता युवकाचा शोध घेण्यासाठी सह्याद्री अ‍ॅडव्हेंचर रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली असून, नदीपात्र, काठ तसेच संभाव्य ठिकाणी शोध घेतला जात आहे. शोधमोहीमेवर पोलिस प्रशासनाकडूनही लक्ष ठेवण्यात येत असून पोलिस निरीक्षक हेमचंद्र खोपडे हे रेस्क्यू पथकासोबत घटनास्थळी उपस्थित होते.

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या शोधमोहीमेत अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नदीच्या प्रवाहाचा वेग आणि परिसरातील परिस्थिती लक्षात घेऊन रेस्क्यू टीमकडून काळजीपूर्वक शोधकार्य सुरू आहे.

दरम्यान, काल ६ वर्षीय चिमुरड्याचा मृतदेह सापडल्यानंतर आता बेपत्ता २९ वर्षीय युवकाचा शोध लागण्याची प्रतीक्षा आहे. प्रशासन, पोलिस आणि रेस्क्यू टीमकडून शोधमोहीम सुरूच ठेवण्यात आली आहे.

शेअर करा