आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची भेट घेत मतदारसंघातील आरोग्यविषयक प्रश्नांवर सविस्तर चर्चा
सावंतवाडी, दि. २६ ऑगस्ट
सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ले तालुक्यातील रुग्णालयांमधील रिक्त असलेली वैद्यकीय अधिकाऱ्यांची (डॉक्टर) पदे तातडीने भरावीत, अशी आग्रही मागणी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली. मुंबई येथील ‘सूरुची’ या शासकीय निवासस्थानी त्यांनी आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन मतदारसंघातील आरोग्यविषयक प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.
या भेटीदरम्यान आमदार केसरकर यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासह परिसरातील इतर रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची मोठी पदे रिक्त असल्याचे आरोग्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. ही पदे त्वरित भरण्यासोबतच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या सोयीसाठी ‘डायलिसिस’ यंत्रणा उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली.
याशिवाय, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न आता सुटला असून, नव्या इमारतीचे बांधकाम लवकरात लवकर सुरू होण्यासाठी आरोग्य विभागाने पुढील आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही तातडीने करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत तिन्ही तालुक्यांतील रिक्त पदे लवकरात लवकर भरली जातील, तसेच सावंतवाडी येथे डायलिसिस यंत्रणा लवकरच उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन दिले.
या भेटीप्रसंगी शिवसेना जिल्हा समन्वयक (सिंधुदुर्ग) सचिन वालावलकर उपस्थित होते.