हेल्मेट-सीटबेल्ट’च्या बंधनातूनच जीवनाचे रक्षण; बांदा पोलिसांचा जनजागृती उपक्रम

शेअर करा


बांदा,दि.३० ऑगस्ट


‘बंधन हेल्मेटचे, रक्षण जीवनाचे; बंधन सीटबेल्टचे, रक्षण जीवनाचे’ या संदेशातून बांदा पोलिसांनी वाहनचालकांमध्ये सुरक्षित वाहतुकीबाबत प्रभावी जनजागृती केली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्या मार्गदर्शनाखाली बांदा सहायक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे यांनी सहकाऱ्यांना सोबत घेत हा उपक्रम यशस्वीपणे राबविला.
हवालदार शेखर मुणगेकर, सिद्धार्थ माळकर, शिपाई खरात, अनिकेत सावंत यांनी व सहकाऱ्यांनी हा उपक्रम राबविला.
वाहन चालविताना हेल्मेट व सीटबेल्टचा वापर हा केवळ वाहतूक नियम नसून स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक पंकज शिंदे यांनी वाहनचालकांना पटवून दिले. दुचाकीस्वारांनी दर्जेदार हेल्मेटचा वापर करून ते व्यवस्थित बांधावे, तर चारचाकी वाहनचालकांनी प्रत्येक प्रवासात सीटबेल्ट लावावा, असे आवाहन करण्यात आले.

‘स्वतःचे संरक्षण करा, कुटुंबाची काळजी घ्या’ हा संदेश देत पोलिसांनी नागरिकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन सिद्धार्थ माळकर यांनी केले. अपघाताच्या वेळी हेल्मेट आणि सीटबेल्ट जीव वाचविण्यासाठी महत्त्वाची सुरक्षा साधने ठरतात. त्यामुळे नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन बांदा पोलिसांनी केले..

शेअर करा