सखोल पुनरीक्षण मोहिमेत अनियमितता ;१५ ऑगस्टला प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण
कणकवली,दि.२७ जुलै
केंद्र शासनाच्या वतीने राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेत बोगस मतदार वगळण्याऐवजी त्यांची नावे पुन्हा मतदार यादीत समाविष्ट केली जात असल्याचा आरोप कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केला. या प्रक्रियेला प्रशासनाचा पाठिंबा असून बीएलओ चुकीच्या पद्धतीने काम करत आहेत. तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांना पाठीशी घातले जात आहे. या कथित अनियमिततेच्या निषेधार्थ १५ ऑगस्टला ध्वजारोहणानंतर प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा संदेश पारकर यांनी दिला आहे.
सोमवारी प्रांताधिकारी जगदीश कातकर यांची नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी भेट घेऊन एसआयआर मोहिमेबाबत आक्षेप नोंदविण्यासाठी निवेदन दिले. यावेळी उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, नगरसेवक रूपेश नार्वेकर, जयेश धुमाळे, सुमेधा अंधारी, सत्यजित पारकर, शिवसेना जिल्हा महिला संघटक मधुरा पालव, सामाजिक कार्यकर्ते निकित मुरकर, तेजस राणे, चेतन अंधारी, माजी नगरसेवक उमेश वाळके, रामदास मांजरेकर, शीतल मांजरेकर, प्रसाद अंधारी आदी उपस्थित होते.
निवेदन दिल्यानंतर प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना श्री. पारकर म्हणाले, कणकवली शहरात वास्तव्यास नसलेल्या व्यक्तींची नावे मतदार यादीत समाविष्ट केली जात आहेत. शहराचा रहिवासी नसताना मतदार म्हणून नोंद होणे चुकीचे असून, संबंधित व्यक्ती त्या शहराचा कायमस्वरूपी रहिवासी असल्यासच त्याला मतदानाचा अधिकार मिळायला हवा. बोगस मतदारांची नावे वगळण्यासाठी ही लढाई कायदेशीर, प्रशासकीय तसेच लोकशाही मार्गाने सुरू ठेवणार आहे.याबाबत १५ ऑगस्टला ध्वजारोहणानंतर प्रांताधिकारी कार्यालयासमोर होणाऱ्या उपोषणात नागरिकांनी सहभागी होऊन साथ द्यावी, असे आवाहन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले.