कणकवली महाविद्यालयात जिल्हास्तरीय वाड्.मय लेखन कार्यशाळेचे आयोजन

शेअर करा

कणकवली,दि.२१ जुलै
येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयातील ‘कनक’ नियतकालिक विभागाच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय वाड्.मय लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.


या कार्यशाळेत इयत्ता अकरावीपासून पदव्युत्तर स्तरापर्यंतच्या कोणत्याही विद्याशाखेतील विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. कार्यशाळेत कविता लेखन, गद्य लेखन, ललित लेखन, वृत्तपत्रीय लेखन आणि स्फुट लेखन अशा विविध साहित्यप्रकारांविषयी नामवंत साहित्यिक व अभ्यासकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासामध्ये वाड्.मय लेखनाला महत्त्वाचे स्थान आहे. लेखनामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला, सर्जनशीलतेला आणि अभिव्यक्ती कौशल्याला चालना मिळते. तसेच वाचनाची आवड, चिकित्सक विचार करण्याची क्षमता आणि भाषेवरील प्रभुत्व विकसित होण्यास मदत होते. विद्यार्थ्यांना आपल्या अनुभवांना, भावना व विचारांना प्रभावी आणि सर्जनशील पद्धतीने व्यक्त करण्यासाठी अशा कार्यशाळा उपयुक्त ठरतात. भविष्यातील साहित्यिक, लेखक, पत्रकार आणि संशोधक घडविण्याच्या दृष्टीनेही या कार्यशाळेचे महत्त्व आहे.


सदर कार्यशाळा गणेशोत्सवापूर्वी एचपीसीएल सभागृहात जिल्हास्तरावर आयोजित करण्यात येणार आहे. कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थी तसेच प्राध्यापकांना सहभागी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकांनी या कार्यशाळेसाठी मोठ्या संख्येने नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. नाव नोंदणीसाठी प्रा. सीमा हडकर (मो. ९४२३३११५१३) यांच्याशी संपर्क साधावा.
असे आवाहन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे, ‘कनक’ नियतकालिक विभागाचे प्रमुख डॉ. सोमनाथ कदम, तसेच प्रा. स्वीटी जाधव, प्रा. दीपा तेंडोलकर, प्रा. विजय सावंत, प्रा. नेहा घोणे आणि प्रा. माधुरी सावंत यांनी केले आहे.

शेअर करा