कणकवली : नांदगाव येथे ईद-ए-मिलादुन्नबी जलसा उत्साहात साजरा

शेअर करा

कणकवली,दि.२६ ऑगस्ट

दरवर्षीप्रमाणे यंदाही नांदगाव येथे ईद-ए-मिलादुन्नबी जलसा मुबारक मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिनानिमित्त नांदगाव तिठा गौसिया मस्जिद तसेच खालची मुस्लिमवाडी गौसिया मस्जिद येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

मिरवणुकीदरम्यान “नारे तकबीर अल्लाहो अकबर”, “नारे रिसालत या रसूलुल्लाह”, “ईद-ए-मिलादुन्नबी जलसा मुबारक” तसेच “हिंदुस्थान जिंदाबाद” अशा घोषणा देण्यात आल्या. पैगंबर जन्मदिनानिमित्त संपूर्ण मुस्लिम मोहल्ल्यातील घरांवर तसेच दोन्ही गौसिया मस्जिदींवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

मिरवणुकीत सहभागी झालेल्या भाविकांसाठी विविध ठिकाणी सरबत, शिरखुर्मा, लाडू, मिठाई, जिलेबी, पाण्याच्या बाटल्या, समोसे, वडे आदी पदार्थांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण मुस्लिम मोहल्ल्यात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बंदोबस्तात सहभागी झालेल्या पोलिस, होमगार्ड तसेच मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. पोलीस चंद्रकांत झोरे , नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, असलदे सरपंच चंद्रकांत डामरे, नांदगाव पोलीस पाटील वृक्षाली मोरजकर, कृषी अधिकारी पवार साहेब, पत्रकार ऋषिकेश मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर यांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला.

मिरवणुकीची सांगता नांदगाव तिठा येथे झाली. यावेळी पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जीवन व संदेशावर तकरीर (प्रवचन) करण्यात आली. कार्यक्रमाला नांदगाव परिसरातील मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शांतता, बंधुभाव आणि उत्साहाच्या वातावरणात ईद-ए-मिलादुन्नबी जलसा मुबारकची सांगता झाली.

शेअर करा