कणकवली : कासार्डेत ५ सप्टेंबरला आमदार प्रमोद जठार मित्रमंडळाची भव्य दहीहंडी

शेअर करा

विजेत्या गोविंदा पथकाला १ लाख ११ हजार १११ रुपयांचे बक्षीस

कणकवली,दि.३० ऑगस्ट

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मानाची दहीहंडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कासार्डे येथील आमदार प्रमोद जठार मित्रमंडळाच्या वतीने शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कासार्डे तिठा येथील महामार्गालगतच्या पटांगणावर दुपारी २ ते रात्री ११ वाजेपर्यंत हा उत्सव रंगणार आहे.

या दहीहंडी उत्सवाला माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायणराव राणे, भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, पालकमंत्री तथा कॅबिनेट मंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, सिंधुदुर्ग भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्यासह भाजपा प्रदेश प्रवक्ते तथा आमदार प्रमोद जठार, दोन्ही जिल्ह्यांतील विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच गाव मानकरी उपस्थित राहणार आहेत.

आमदार प्रमोद जठार मित्रमंडळाचा हा नॉनस्टॉप १४ वा दहीहंडी उत्सव असून दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात हा सोहळा साजरा केला जातो. यंदाही दहीहंडीच्या निमित्ताने विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

आठ थरांच्या गोविंदा पथकासाठी १ लाख ११ हजार १११ रुपयांचे बक्षीस

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील गोविंदा पथकांना या दहीहंडी उत्सवात सहभागी होता येणार आहे. आठ थरांचा मनोरा रचून दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला रोख १ लाख ११ हजार १११ रुपये आणि आकर्षक ‘कोकण दूध चषक’ प्रदान करण्यात येणार आहे.

तसेच चार थरांची सलामी देणाऱ्या पथकाला ३ हजार ३३३ रुपये, पाच थरांसाठी ४ हजार ४४४ रुपये, सहा थरांसाठी ५ हजार ५५५ रुपये, तर सात थरांची सलामी देणाऱ्या पथकाला ६ हजार ६६६ रुपये रोख बक्षीस व आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.

ग्रामीण भागातील गोविंदा पथकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या कौशल्याला प्रोत्साहन देणे आणि नव्या गोविंदा पथकांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने दोन जिल्ह्यांतील पथकांसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

‘म्युझिकल नाईट’ ठरणार आकर्षण

दुपारी २.३० वाजता स्थानिक प्रतिष्ठित मानकरी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून दहीहंडी उत्सवाचा शुभारंभ होणार आहे. यावेळी डीजे आणि ढोलपथकांच्या गजराने कासार्डे परिसर दुमदुमणार आहे.

सायंकाळी ४ वाजल्यानंतर रसिक प्रेक्षकांसाठी कोल्हापूर येथील ३५ कलाकारांचा संच असलेला रजनी गोरड प्रस्तुत ‘ऑर्केस्ट्रा धमाका म्युझिकल नाईट’ हा मनोरंजनाचा विशेष कार्यक्रम होणार आहे. जुन्या-नव्या मराठी व हिंदी रिमिक्स गाण्यांसह लावणी, नृत्यगीतांचा जल्लोष, उत्कृष्ट गायक व निवेदक, अत्याधुनिक साउंड सिस्टीम, स्पेशल लेझर व नेत्रदीपक लाईट इफेक्ट्स यामुळे कार्यक्रमाची रंगत वाढणार आहे.

प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ कुपन व आकर्षक भेटवस्तूंचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

या भव्य दहीहंडी उत्सवात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील गोविंदा पथकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार प्रमोद जठार मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. इच्छुक गोविंदा पथकांनी नावनोंदणी व अधिक माहितीसाठी मंडळाचे अध्यक्ष प्रसाद जाधव (मो. ९४०३२८९००५) किंवा रोहित महाडीक, भाजपा कार्यालय कासार्डे (मो. ७०६६९३१०५३) यांच्याशी संपर्क साधावा.

शेअर करा