आयुर्वेदिक रोपांसह दर्जेदार रोपांची होणार निर्मिती; महिलांसाठी रोजगाराचे नवे दालन
कणकवली,दि.२८ ऑगस्ट
कणकवली : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत महिला किसान सशक्तिकरण परियोजना (MKSP), तालुका कणकवली, कळसुली प्रभागाच्या माध्यमातून IFC – एकात्मिक शेती प्रभाग विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत ज्योत उत्पादक समूह, ओसरगाव (खासकिल) यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या रोपवाटिका युनिटचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला.
या रोपवाटिका युनिटचे उद्घाटन पंचायत समिती कणकवलीच्या सभापती हर्षदा वाळके यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी महिला स्वयंसहायता समूहांनी विविध शेतीपूरक व्यवसायांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचे आवाहन केले. रोपवाटिका व्यवसायातून महिलांना स्थानिक पातळीवर रोजगार आणि उत्पन्नाचे चांगले साधन निर्माण होऊ शकते, असा विश्वास सभापती हर्षदा वाळके यांनी व्यक्त केला.
आयुर्वेदिक रोपे ठरणार खास आकर्षण
या रोपवाटिका युनिटचे विशेष आकर्षण म्हणजे दर्जेदार रोपांसोबतच आयुर्वेदिक रोपे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. स्थानिक गरजा लक्षात घेऊन विविध प्रकारच्या रोपांची निर्मिती व उपलब्धता या माध्यमातून केली जाणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना लागवडीसाठी चांगल्या दर्जाची रोपे स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार असून, आयुर्वेदिक वनस्पतींच्या लागवडीला आणि वापराला प्रोत्साहन मिळणार आहे.
रोपवाटिका युनिटच्या माध्यमातून महिलांना व्यवसायाचे शाश्वत साधन उपलब्ध करून देणे, त्यांच्या उत्पन्नात वाढ करणे आणि एकात्मिक शेतीला चालना देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. या माध्यमातून शेतीसोबतच पूरक व्यवसाय उभारून महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याची संधी मिळणार आहे.
कार्यक्रमावेळी जिल्हा परिषद सदस्य शितल दळवी, पंचायत समिती सदस्य लक्ष्मण गावडे, पंचायत समिती सदस्य अक्षता राणे, सरपंच सुप्रिया कदम, पोलीस पाटील संजना आंगणे, तालुका अभियान व्यवस्थापक दक्षता पांजरी, प्रभाग समन्वयक कळसुळी पूजा चव्हाण, तालुका ब्लॉक अँकर मयूर धुमाळे, सिनियर सीआरपी सान्वी गावडे, रसिका शिरवलकर, प्रभाग संघ अध्यक्ष, अनुजा दळवी, सचिव, संजना घाडीगावकर, कोषाध्यक्ष, प्रभाग संघ लिपिका नीता गुरव, ग्रामसंघ लिपिका स्वप्ना मेस्त्री, ग्रामसंघ अध्यक्ष प्रतिक्षा चौकेकर, ग्रामसंघ सचिव नुपूर मोरे आणि ग्रामसखी दीक्षा कुलकर्णी यांच्यासह मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिला स्वयंसहायता समूहांच्या माध्यमातून उभारल्या जाणाऱ्या विविध व्यवसायांचे महत्त्व अधोरेखित केले. स्थानिक पातळीवर उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करून महिलांनी शेतीपूरक व्यवसायाकडे वळावे आणि आर्थिक उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करावेत, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमास ओसरगाव परिसरातील ग्रामस्थ तसेच उमेद अभियानातील सर्व सीआरपी ताई मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ज्योत उत्पादक समूह ओसरगाव यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या रोपवाटिका युनिटमुळे परिसरातील महिलांना व्यवसायाची नवी संधी उपलब्ध होणार असून, स्थानिक पातळीवर शेतीपूरक उद्योगाला चालना मिळण्यास मदत होणार आहे.
या उपक्रमामुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासोबतच परिसरात दर्जेदार व आयुर्वेदिक रोपांची उपलब्धता, शेतीतील विविधता आणि एकात्मिक शेतीचा विकास यांना चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ज्योत उत्पादक समूह ओसरगाव, प्रभाग संघ, ग्रामस्थ तसेच उमेद अभियानातील सर्व संबंधित पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.