रोजगारनिर्मितीसह शेतकरी व महिला बचतगटांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न : माजी आ. परशुराम उपरकर
कणकवली, दि. ३० ऑगस्ट
पानेरी भाजीपाला व फळेफुले उत्पादक खरेदी-विक्री सहकारी संस्थेतर्फे कणकवली शहरात लवकरच भाजीपाला, फळे व फुलांची विक्री केंद्रे सुरू करण्यात येणार असून, या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा प्रयत्न राहणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिली.
पानेरी भाजीपाला व फळेफुले उत्पादक खरेदी-विक्री सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच कणकवली येथील श्री. भवानी सभागृहात उत्साहात पार पडली. यावेळी सभेला संस्थेचे सचिव संतोष सावंत, संस्थापक चंद्रशेखर उपरकर, संचालक सखाराम सपकाळ, दिलीप हिंदळेकर, विलास गुढेकर, दिलीप सावंत, सुनील जंगले, दैवदीप कुलकर्णी, गुरुनाथ तिरपणकर यांच्यासह संस्थेचे सभासद उपस्थित होते.
सभेत संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कणकवली परिसरातील काही ठिकाणी महिला बचतगट तसेच व्यक्तिगत विक्रेत्यांना भाजीपाला, फळे व फुलांची विक्री करण्यासाठी स्टॉल उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे स्थानिक उत्पादकांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार असून, महिला बचतगटांनाही उत्पन्नाचे साधन उपलब्ध होणार आहे.
तसेच गावठी भाजीपाला उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे, गावनिहाय भाजीपाला उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती संकलित करणे आणि उत्पादकांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला.
संस्थेच्या घटनेनुसार भाजीपाला, फळे व फुले उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर गोदाम उपलब्ध करून देणे, ग्रास कटर व इतर आवश्यक साहित्य पुरविणे, तसेच शेतकऱ्यांना माल खरेदीसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करणे, अशा विविध विषयांवरही सभेत चर्चा करण्यात आली.
यावेळी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण, जमा-खर्च, ताळेबंद तसेच नफा-तोटा पत्रक सभेसमोर मांडून त्यास मंजुरी देण्यात आली.
शेतकरी, महिला बचतगट आणि भाजीपाला, फळे-फुले उत्पादकांना संस्थेच्या माध्यमातून अधिक चांगली बाजारपेठ उपलब्ध करून देण्याबरोबरच रोजगारनिर्मितीवरही भर दिला जाणार आहे. यासाठी संस्थेचे कामकाज अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
भाजीपाला, फळे-फुले उत्पादन करणारे तसेच विक्री करणारे शेतकरी आणि महिला बचतगटांनी अधिक माहितीसाठी पानेरी भाजीपाला व फळेफुले उत्पादक खरेदी-विक्री सहकारी संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले.