Kudal news : वेताळ बांबर्डे तिठा–हिर्लोक–नारुर मार्गाची दुरवस्था; वाहनचालक त्रस्त!

शेअर करा

रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे, साईडपट्टी खचल्याने अपघाताचा धोका; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये नाराजी!

कुडाळ,दि.२८ ऑक्टोंबर

कुडाळ तालुक्यातील महामार्गालगत असलेल्या वेताळ बांबर्डे तिठा ते हिर्लोक-नारुर या मुख्य मार्गाची दूरवस्था झाली आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र या मार्गाच्या योग्य दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत आहे.
बांबर्डे तिठा ते पावणाई टेंब हा महत्त्वाचा भाग पूर्णतः धोकादायक बनला आहे. या भागात साईड पट्टी खचली असून यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. रात्रीच्या वेळी वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. गणपती सणापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्ड्यांची तात्पुरती डागडुजी केली होती. येथील खड्ड्यात काँक्रीट ग्रिट घालून ते बुजविण्यात आले होते. मात्र, आठ दिवसात पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात नागरिकांना खड्ड्यातूनच ये-जा करावी लागली होती. आताही या मार्गाची वाताहत झाली आहे. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधी सुशेगाद असल्याचे पाहायला मिळत आहे.

गटार नसल्याने मार्गाची दुरवस्था
वेताळ बांबर्डे तिठा ते हिर्लोक-नारुर हा मार्ग साधारण १५ किमी अंतराचा असून येथे कोठेही पाणी जाण्यासाठी गटार नाही. यामुळे पावसात मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावरून जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात.

मार्गावरून शेकडो वाहनांची ये-जा
हा मार्ग लांब पल्ल्याचा असल्याने एसटी बस, ट्रक, कार, दुचाकी यांची वर्दळ असते. मात्र, या रस्त्याची साईड पट्टी पूर्ण खचून गेल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. रात्रीच्या वेळी मोठी वाहने आल्यावर दोन्ही वाहने एकाच वेळी जाऊ शकत नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी होते.

पावणाई टेंब ते आईनमळा मार्गाची परिस्थिती जैसे थेच
वेताळ बांबर्डे पावणाई टेंब ते आईनमळा हा मार्ग सुद्धा पूर्णतः खड्डेमय बनला आहे. या मार्गाची साईड पट्टी सुद्धा खचली असून याकडे प्रशासन किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष झाले आहे. तीन-चार किमी अंतराचा हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे अयोग्य असून याचीही डागडुजी होणे आवश्यक आहे.

शेअर करा