कुडाळ,दि.३० ऑगस्ट
वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ, शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय पणदूरतिठा येथे शालेय मंत्रिमंडळ शपथविधी व बॅच प्रदान सोहळा २७ ऑगस्ट रोजी संपन्न झाला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ॲड महेंद्र माळगांवकर (कुडाळ) उपस्थित होते. संधी शोधून ती वापरावी लागते. शालेय मंत्रिमंडळ संसदीय पद्धतीने लढविणे कठीण असते लोकशाहीचे आधारस्तंभ ज्याप्रमाणे महत्त्वाचे असतात त्याप्रमाणे शालेय व्यवस्थापनामध्ये शाळेचे आधारस्तंभ असलेले मंत्रिमंडळ महत्वाचे आहे. शालेय व्यवस्थापन व शिक्षक यामधील शालेय मंत्रिमंडळ एक दुवा आहे. वाचनाचा छंद बाळगावा त्याचप्रमाणे सहनशीलता, सभाधिटपणा, विनम्रता हे गुण अंगीकारणेही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
संस्था संचालक महेश पाटील यांनी शाळा एक कुटुंब आहे. तेच सुस्थिती चालवण्यासाठी सुसंगत संघटनांची गरज असते. शालेय कारभारामध्ये शालेय मंत्रिमंडळाचे योगदान महत्त्वाचे आहे, याविषयी मार्गदर्शन केले.

संस्थेचे अध्यक्ष आप्पा गावडे यांनी अध्यक्षीय भाषण देताना कै. गुरुवर्य अणावकर सर यांनी सुरू केलेली या कार्यक्रमाला आपल्याच प्रशालेतील माजी विद्यार्थी जे कायद्याचा अभ्यास करत आहेत किंवा केला आहे. त्यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करून करावे ही परंपरा यावर्षी आणि यापुढेही चालू राहिली याविषयी माहिती दिली. ईव्हीएम मशीन ॲपद्वारे शालेय मंत्रिमंडळ निवडणूक घेण्याचे नियोजन शिक्षक सामंत व शिक्षक हेबाळकर यांनी केल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले.
या कार्यक्रमाला मुख्याध्यापक मिलिंद कर्पे, माध्यमिक विभाग पर्यवेक्षक दाभोलकर, उच्च माध्यमिक विभाग पर्यवेक्षक सावंत, शिक्षक वृंद व विद्यार्थी हे सर्व मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मुख्याध्यापक कर्पे यांनी केले तर सूत्रसंचालन शिक्षक पाटील यांनी केले.