आकर्षक बक्षिसांची लयलूट
मालवण,दि.२५ ऑगस्ट
नारळी पौर्णिमेनिमित्त गुरुवार दि. २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता मालवण बंदर जेटी येथे आमदार निलेश राणे यांच्या सहकार्यातून शिवसेना-भाजप महायुतीच्या वतीने महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मालवणच्या नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी दिली.
महिलांसाठी विशेष आकर्षण असलेल्या या स्पर्धेत मोठ्या बक्षिसांची लयलूट असणार आहे. स्पर्धेतील विजेत्या महिलेला सोन्याची नथ, मानाची पैठणी आणि फ्रिज असे प्रथम पारितोषिक देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यास वॉशिंग मशीन, तर तृतीय क्रमांक चांदीचा कुंकवाचा करंडा, चतुर्थ क्रमांक चांदीचा छल्ला, पाचव्या व सहाव्या क्रमांकाच्या विजेत्यांना प्रत्येकी मिक्सर देण्यात येणार आहे.
अनेक वर्षांपासून मालवणच्या नारळी पौर्णिमा उत्सवाचा एक महत्त्वाचा भाग ठरलेल्या या नारळ लढविणे स्पर्धेला यंदा आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक भव्य स्वरूप देण्यात आले आहे. भाजप-शिवसेना यांच्या वतीने मोठ्या बक्षिसांचा वर्षाव असलेली ही स्पर्धा आम्ही सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांच्या संकल्पनेतून शिवसेना-भाजप महायुतीच्या एकत्रित आयोजनातून होणार आहे, असे सौ. वराडकर यांनी सांगितले.
या स्पर्धेला खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांनाही निमंत्रित करण्यात येणार आहे. आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या प्रमुख उपस्थिती सह शिवसेना व भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महिलांनी स्पर्धेच्या दिवशी स्पर्धा सुरू होण्याच्या एक तास अगोदर आपली नावनोंदणी करणे आवश्यक आहे. नावनोंदणीसाठी भाजप महिला शहराध्यक्ष तथा मालवण नगरपरिषद महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर ९४०४३४४३२२ तसेच शिवसेना कुडाळ-मालवण संघटक तथा मालवण नगरपरिषद स्वच्छता व आरोग्य सभापती पुनम चव्हाण ९४०४६८९३१६ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.