मालवण : मच्छिमारी करणारी होडी समुद्रात उलटून दोघांचा बुडून मृत्यू

शेअर करा

एकला वाचविण्यात यश

मालवणदि.१ सप्टेंबर

मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मागील समुद्रात मासेमारी करत असताना लाटांच्या तडाख्यात एक मासेमारी नौका पलटी झाल्याने मालवण दांडी येथील नौका मालक तसेच मच्छिमार नेते सन्मेष सुरेश परब व अक्षय हनुमंत राणे या दोन मच्छिमारांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. तर सन्मेष परब यांचा मुलगा सुयोग सन्मेष परब याला वाचविण्यात यश आले. मच्छिमारी हंगामाच्या प्रारंभीच मालवणच्या समुद्रात घडलेल्या या दुर्घटनेने अवघी किनारपट्टी शोकसागरात बुडून गेली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मालवण दांडी येथील मच्छिमार सन्मेश सुरेश परब यांनी काल सायंकाळी समुद्रात मासेमारी साठी जाळी मारून ठेवली होती. आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सन्मेष परब हे त्यांच्या मालकीच्या नौकेतून मुलगा सुयोग सन्मेश परब आणि खलाशी अक्षय हनुमंत राणे यांच्यासोबत दांडी समोरील सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मागील भागात मासेमारीची जाळी काढण्यासाठी गेले. मात्र किल्ल्या मागील समुद्रातील खडकाळ भागात लाटा मोडत होत्या. याच दरम्यान एका जोरदार लाटेच्या तडाख्यात परब यांची नौका समुद्रात पलटी झाली. यावेळी नौकेतील तिघेही पाण्यात फेकले गेले. ते स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच दुसऱ्या लाटेच्या तडाख्याने सन्मेष परब व अक्षय राणे हे समुद्रात बेपत्ता झाले. तर सुयोग परब याने नौकेतील डब्यांचा आधार घेतल्याने तो पाण्यात तरंगत राहिला. ही दुर्घटना समजताच स्थानिक मच्छिमारांनी समुद्रात धाव घेतली. यावेळी जयदेव लोणे यांच्या नौकेतून सुयोग परब याला पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

या दुर्घटनेनंतर काही वेळाने सन्मेष परब व अक्षय राणे यांचे मृतदेह मच्छिमारांना समुद्रात आढळून आल्यावर हे मृतदेह किनाऱ्यावर आणण्यात आले. त्यानंतर दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी मालवण ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते.

या दुर्घटनेबद्दल कळताच दांडीसह मालवण किनारपट्टीवरील मच्छिमारांनी दांडी किनाऱ्यावर गर्दी केली होती. पारंपारिक मच्छिमारांच्या लढ्यात सन्मेष परब हे नेहमीच अग्रणी असायचे. पारंपारिक मच्छिमारांच्या लढ्यातील अनेक आंदोलने, उपोषणे यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. तसेच पूर्वी उबाठा शिवसेना व अलीकडेच भाजप पक्षातून ते राजकारणातही सक्रिय असल्याने दांडी भागात त्यांचा मोठा प्रभाव होता. भाजपच्या मालवण शहर मंडल उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते मालवणच्या माजी नगरसेविका सेजल परब यांचे ते पती होत.

शेअर करा