मालवण: गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या; गणेशभक्तांची मोठी गर्दी

शेअर करा

फुलपत्री, माटवीचे साहित्य, पूजा-सजावट व किराणा खरेदीसाठी भक्तांची झुंबड; महागाईची झळ असूनही गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला

मालवण,दि.१३ सप्टेंबर(प्रफुल्ल देसाई)

कोकणचा महाउत्सव असलेल्या गणेश चतुर्थी सणाला उद्या १४ सप्टेंबर पासून प्रारंभ होत असून गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आतुर असलेल्या गणेश भक्तांचा उत्साह शिगेला पोहचला आहे. आज गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी फुलपत्री, माटवीचे सामानाचा बाजार मालवण सह कोकणातील सर्वच बाजारपेठामध्ये फुलला असून फुलपत्री तसेच पूजा व सजावट, किराणा माल खरेदीसाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी झाली आहे. सध्या सर्वत्र महागाईच्या झळा बसत असतानाही नेहमीप्रमाणेच गणेशोत्सव थाटामाटात आणि दणक्यात साजरा करायचा या भावनेने गणेशभक्तांची खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. यावर्षी फुलपत्रीच्या विविध सामनाचे दरही वाढले असून बेल, धोतरा, आघाड्याची पान हरणे, तिरडा, हदगा,सुपारीचे चिपाड, वगैरे साहित्याची खरेदी करण्यासाठी गर्दी झाली होती

तसेच उद्यापासून गणेशोत्सव सुरु होणार असल्याने मत्स्य खवय्याना माशांवर ताव मारता येणार नसल्याने आज चतुर्थीचा आदल्या दिवशी व त्यातच रविवार असल्याने आजच माशांवर मनसोक्त ताव मारून घ्यावा या उद्देशाने मालवणच्या मासळी बाजारातही मोठी गर्दी झाली होती. गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर मुंबईकर चाकरमानी मालवणात दाखल झाले असल्याने त्यांनी मोरी, सुरमई, पापलेट कोलंबी या मासे खरेदीसाठी गर्दी केली होती.

शेअर करा