मालवण : भव्य प्रभात फेरीत देशभक्तीच्या घोषणांनी मालवण शहर दणाणले

शेअर करा

विद्यार्थ्यांचे लेझीम नृत्य ठरले आकर्षण

मालवण ,दि.१५ ऑगस्ट
‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’, ‘जय जवान, जय किसान’ अशा देशभक्तीपर घोषणांनी आसमंत दणाणून सोडत आज सकाळी मालवणात भंडारी हायस्कूल आणि मालवण पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांनी भव्य प्रभात फेरी काढत भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला

मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. प्रशालेच्या आवारात ध्वजारोहण झाल्यानंतर मालवण शहरातून प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीत भंडारी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांच्या तालावर सादर केलेले लेझीम नृत्य विशेष आकर्षण ठरले.
भरड नाका येथे विद्यार्थ्यांनी तालबद्ध पद्धतीने लेझीम नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त आणि शिस्तबद्ध सादरीकरणाने उपस्थित नागरिक भारावून गेले. हे नृत्य पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे उपस्थितांनी कौतुक केले.
लेझीम नृत्यासाठी प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सौ. राधा दिघे आणि सौ. योगिता तारी यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
या प्रभात फेरीत मालवणचे गटशिक्षणाधिकारी अजिंक्य कोतमिरे, शिक्षण विस्तार अधिकारी संजय माने, भंडारी हायस्कूलचे मुख्याध्यापक आर. डी. बनसोडे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भूपेश गोसावी, ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई, पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शेअर करा