मालवण,दि.१५ ऑगस्ट
मालवण येथील स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय सलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयात स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून भव्य ‘समरगीत’ (देशभक्तीपर गीत) स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस देशभक्तीपर गीते सादर करून वातावरण देशप्रेमाच्या रंगात रंगवून टाकले.
विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना रुजावी आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली.
विद्यार्थ्यांच्या सुरेल आणि ऊर्जस्वी सादरीकरणाला उपस्थित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजर करत भरभरून दाद दिली. प्राचार्यांनी आपल्या भाषणात सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन कु. जान्हवी कदम हिने केले.