जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय; प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता
मालवण,दि.२८ ऑगस्ट
वेंगुर्ला-मालवण मार्गावरील केळुस तिठा येथे प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक तसेच मालवण येथे साठवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या रामचंद्र विश्राम लुडबे (३२, रा. वायरी-लुडबेवाडी, मालवण), प्रफुल्ल दयाळ लुडबे (३८, रा. वायरी-लुडबेवाडी, मालवण) आणि संजय लक्ष्मण गोलतकर (५६, रा. भरड, मालवण) या
तिघा संशयितांना ओरोस येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या सशर्त जामिनावर मुक्त केले आहे. संशयितांतर्फे अॅड. स्वरुप नारायण पई व अॅड. यतिश खानोलकर यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.
दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी निवती पोलिसांकडून महामार्ग तपासणी सुरू असताना वेंगुर्ला ते मालवण मार्गावरील केळुस तिठा येथे चारचाकी वाहनातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची वाहतक होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी रामचंद्र लुडबे व प्रफुल लुडबे यांच्याविरुद्ध दि. ९ ऑगस्ट रोजी निवती पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, २७१, २७५ तसेच अन्नसुरक्षा व मानके कायदा कलम ५९ अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती.
दोघांना न्यायालयात हजर केल्यानंतर सुरुवातीला पोलीस कोठडी, त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांना प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ मालवण येथील व्यक्तीला विकल्याची माहिती मिळाल्याने संजय गोलतकर यांच्या भरड येथील ठिकाणी छापा टाकण्यात आला. या कारवाईत प्रतिबंधित माल आढळून आल्याने गोलतकर याला दि. १२ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर तिन्ही संशयितांनी ओरोस येथील जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. सुनावणीअंती न्यायालयाने प्रत्येक संशयितास ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला.
गुन्ह्याची पुनरावृत्ती न करणे, तपासात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप न करणे, साक्षीदारांवर दबाव न आणणे तसेच पोलिस ठाण्यात आवश्यकतेनुसार हजेरी लावणे, अशा अटी न्यायालयाने जामिनासोबत घातल्या आहेत.