मालवण तालुक्यातील चोके-साळेल परिसरातील घटना; प्राथमिक उपचारानंतर जखमीला ओरोस जिल्हा रुग्णालयात हलविले
मालवण,दि.२५ ऑगस्ट
कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील निलजी गावातील मानदेश निगोळा पाटील यांनी चोके-साळेल रस्त्यावरील चिरेखाणीवर स्वतःच्या गळ्यावर तसेच शरीराच्या इतर भागांवर धारदार सुरीने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना आज सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत ते गंभीर जखमी झाले असून, पुढील उपचारासाठी त्यांना ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मानदेश पाटील हे गडहिंग्लज-निलजी परिसरातून चोके येथे चिरे भरण्यासाठी आलेल्या एका वाहनावर क्लीनर म्हणून काम करतात. चोके-साळेल परिसरातील एका चिरेखाणीवर असताना त्यांनी सोबत आणलेल्या धारदार सुरीने स्वतःच्या गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोट, हात आणि शरीराच्या इतर भागांवरही त्यांनी वार करून घेतले.
घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने त्यांना चोके प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. साहिली मिठारी व आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी प्राथमिक उपचार केले. मात्र जखमांची गंभीरता लक्षात घेऊन पुढील उपचारासाठी त्यांना ओरोस जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
दरम्यान, घटनेची माहिती मालवण पोलिस ठाण्यात मिळाल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक पी. व्ही. पाटील, पोलिस उपनिरीक्षक आशिष भगत, हेमंत धुरी, सुहास पांचाळ, सूरज रेडकर तसेच साळेलचे पोलिस पाटील रवींद्र गावडे यांनी चोके प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट देऊन घटनेची माहिती घेतली.
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, जखमी व्यक्तीने स्वतःवरच वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या घटनेचा अधिक तपास मालवण पोलिसांकडून सुरू आहे.
जखमीला रुग्णालयात दाखल करण्यासाठी चोके गावचे माजी सरपंच राजा गावडे, नांदगावचे सरपंच भाऊ चव्हाण, बंड्या गावडे, मानस गावडे, अमोल चव्हाण, साई गावडे, गोठ्या गावडे यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी मदत केली. जखमीची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.