Masure News : गुरुकृपा हार्ट फाउंडेशनतर्फे विक्रमगडमधील ६४७ विद्यार्थ्यांना थंडीपासून संरक्षणासाठी मदत!

शेअर करा

डॉ. जी. पी. रत्नापारखी यांच्या नेतृत्वाखाली दुर्गम आदिवासी भागातील दोन जिल्हा परिषद शाळांमध्ये सतरंजी व ब्लँकेटचे वाटप!

​मसुरे,दि.२८ ऑक्टोंबर (झुंजार पेडणेकर)


डॉ. जी. पी. रत्नापारखी यांच्या नेतृत्वाखालील ‘गुरुकृपा हार्ट फाउंडेशन’च्या वतीने विक्रमगड तालुक्यातील अत्यंत दुर्गम व आदिवासी भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
​या उपक्रमांतर्गत जि. प. शाळा करहे (तळवली) येथील ४३१ विद्यार्थी आणि जि. प. शाळा सावरखिंड येथील २१६ विद्यार्थी अशा एकूण ६४७ विद्यार्थ्यांना सतरंजी (बेडशीट) आणि ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. विक्रमगड परिसरात हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर कडाक्याची थंडी असते, या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना थंडीपासून संरक्षण मिळण्यासाठी हे साहित्य अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
​त्याचप्रमाणे दिवाळीच्या औचित्य साधून ‘दिवाळी भाऊबीज भेट’ म्हणून भागातील ३५० गरजू आदिवासी महिलांना साडी वाटप करण्यात आले. सुमारे ३ तास २० मिनिटांचा खडतर व थकवणारा प्रवास करून फाउंडेशनच्या टीमने प्रत्यक्ष या दुर्गम भागात जाऊन हा मदत उपक्रम राबवला. या कार्यक्रमाद्वारे एकूण १००० हून अधिक नागरिक व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ झाला आहे..


​या वेळी उपस्थित शिक्षक, पालक आणि गावकऱ्यांनी गुरुकृपा हार्ट फाउंडेशनच्या या वेळेवर मिळालेल्या अत्यंत योग्य आणि मोलाच्या मदतीबद्दल मनापासून आभार मानले व उपक्रमाचे कौतुक केले.​”दिवाळी भाऊबीजेचे औचित्य साधून आदिवासी भागातील मुले आणि महिलांना छोटीशी मदत करता आली, याचा संपूर्ण टीमला मनापासून आनंद आणि समाधान आहे.”
असे यावेळी डॉ जि पी रत्नपारखी म्हणाले.
​या सामाजिक उपक्रमात गुरुकृपा हार्ट फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. जी. पी. रत्नापारखी, डॉ. शशांक शाह, डॉ. स्मृती रत्नापारखी आणि सौ. दीपा श्रॉफ हे प्रमुख उपस्थित होते.

शेअर करा