Masure News : ​स्व. भागीरथी तुकाराम पेडणेकर सेवा संस्थेचा सामाजिक वसा!

शेअर करा

देवगड खाकशीवाडीत १५० जणांना टी-शर्ट व ब्लँकेटचे वाटप संपन्न

मसुरे,दि.०२ नोव्हेंबर
वात्सल्य मूर्ती स्वर्गीय भागीरथी तुकाराम पेडणेकर सेवा संस्था, मुंबई यांच्या वतीने स्व. भागीरथी तुकाराम पेडणेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देवगड तालुक्यातील खालची खाकशीवाडी येथे विलास पेडणेकर यांच्या निवासस्थानी सुमारे दीडशे जणांना टी-शर्ट व ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. या सामाजिक उपक्रमामुळे ग्रामस्थांमधून संस्थेच्या कार्याबद्दल विशेष समाधान व्यक्त केले जात आहे.

​कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि स्व. भागीरथी तुकाराम पेडणेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी परिसरातील आबालवृद्ध आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना अक्कलकोट भूषण पुरस्कार प्राप्त तथा संस्थापक नंदकुमार पेडणेकर म्हणाले, आमची आई
​स्वर्गीय भागीरथी तुकाराम पेडणेकर यांच्या विचारांचा वसा पुढे चालवत ही संस्था विविध सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रम राबवणार आहे. पुढील काळात संस्थेच्या माध्यमातून अनेक लोककल्याणकारी उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. “समाजसेवा हीच खरी ईश्वराची सेवा आहे. आपल्या माणसांच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणणे हेच आईच्या स्मृतीस आदरांजली वाहण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. मुंबईसारख्या शहरात कार्यरत असतानाही आपल्या मूळ गावाशी आणि माणसांशी असलेले आपले नाते कधीही तुटता कामा नये, या भावनेतूनच संस्था असे उपक्रम राबवत आहे. ग्रामस्थांचे सहकार्य लाभल्यास भविष्यात याहूनही मोठे समाजोपयोगी प्रकल्प या भागात राबवले जातील. कोकण कट्टा सामाजिक संस्था मुंबई चे अध्यक्ष
​श्री. अजित दीनानाथ पितळे यांनी आपल्या भाषणात पेडणेकर सेवा संस्थेच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले, “नंदकुमार पेडणेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुंबईत स्थायिक होऊनही आपल्या मातीशी आणि ग्रामीण भागातील लोकांशी असलेली बांधिलकी अत्यंत सुंदररीत्या जपली आहे. कोकण कट्टा सामाजिक संस्था अशा प्रत्येक चांगल्या आणि समाजोपयोगी उपक्रमात नेहमीच खांद्याला खांदा लावून सोबत उभी राहील.
​या कार्यक्रमास ‘अक्कलकोट भूषण पुरस्कार’ प्राप्त तथा संस्थेचे संस्थापक श्री. नंदकुमार तुकाराम पेडणेकर, ‘कोकण कट्टा सामाजिक संस्था’ संस्थापक श्री. अजित दीनानाथ पितळे, श्री. प्रभाकर यशवंत राणे, श्री. मधुसूधन भडसाळे, श्री. मोहन कृष्णा पेडणेकर, पत्रकार श्री. स्वप्नील लोके आदी मान्यवर तसेच खालची खाकशीवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा