धनत्रयोदशीनिमित्त जाहीर केलेली स्थानिक सुट्टी सोमवार, ९ नोव्हेंबर २०२६ रोजी लागू; शासकीय व निमशासकीय कार्यालयांना सुधारित आदेश
सिंधुदुर्ग,दि.०२ नोव्हेंबर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी सन २०२६ या वर्षाकरिता जाहीर करण्यात आलेल्या स्थानिक सुट्ट्यांच्या यादीत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार, यापूर्वी ६ नोव्हेंबर २०२६ (शुक्रवार) रोजी धनत्रयोदशीनिमित्त जाहीर करण्यात आलेली स्थानिक सुट्टी आता ९ नोव्हेंबर २०२६ (सोमवार) रोजी जाहीर करण्यात आली आहे.
शासनाच्या राजशिष्टाचार विभाग व सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक १४ मार्च १९८३ रोजीच्या अधिसूचनेन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी हा बदल केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या आदेशान्वये जाहीर करण्यात आलेल्या स्थानिक सुट्ट्यांच्या यादीतील अ.क्र. ३ मध्ये हा बदल करण्यात आला आहे.
हा बदल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांना लागू राहणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.