सावंतवाडीत ऐतिहासिक मोती तलावावर नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी; मानाचा सुवर्ण नारळ तलावात अर्पण

शेअर करा

सावंतवाडी,दि.२७ ऑगस्ट
सावंतवाडी शहराची ओळख असलेल्या ऐतिहासिक मोती तलावाच्या काठावर आज पारंपरिक उत्साहात नारळी पौर्णिमा सोहळा पार पडला. वर्षानुवर्षांच्या परंपरेनुसार सावंतवाडीकरांनी मोती तलावात नारळ अर्पण करून जलदेवतेला नमन केले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही सावंतवाडी पोलीस ठाण्यातून मानाच्या सुवर्ण नारळाची वाजत-गाजत, मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक मोती तलावाच्या काठावर पोहोचल्यानंतर सावंतवाडी संस्थानचे राजेसाहेब खेमसावंत भोसले आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या प्रमुख उपस्थितीत सुवर्ण नारळाचे विधीवत पूजन करण्यात आले. पूजनानंतर हा मानाचा नारळ अत्यंत श्रद्धेने मोती तलावाच्या जलात अर्पण करण्यात आला.
​युवकांचा उत्साह अन् गर्दीवर परिणाम
सुवर्ण नारळ तलावात अर्पण करताच उपस्थित स्थानिक युवकांनी पाण्यात उड्या मारून नारळ मिळवण्यासाठी एकच उत्सुकता दाखवली. मात्र, दरवर्षीच्या तुलनेत यंदा तलावाकाठी नागरिकांची आणि पर्यटकांची गर्दी काहीशी कमी पाहायला मिळाली.
या पारंपरिक सोहळ्याला सावंतवाडी संस्थानचे राजे खेमसावंत भोसले, युवराज लखमराजे भोसले, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, सभापती आनंद नेवगी, सभापती दिपाली भालेकर, माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, सभापती सुधीर आडीवरेकर, दिलीप भालेकर, काका मांजरेकर, कृष्णा राऊळ, श्री. गवस, पोलीस कर्मचारी श्री. धोत्रे, आबा पिळणकर यांसह अनेक स्थानिक नागरिक उपस्थित होते.
​दरम्यान, स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्या वतीने अर्चित पोकळे यांनी मोती तलावात श्रीफळ अर्पण करून या परंपरेत सहभाग नोंदवला.

शेअर करा