🔴महसूल विभाग व सरपंच यांनी केली प्रत्यक्ष पाहणी
🔴चुकीच्या बातम्यामुळे फोंडाघाट मध्ये भीतीचे वातावरण
फोंडाघाट,दि.२४ जून (संजय सावंत )
मागील दोन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जमीन खचल्याने फोंडाघाट विद्यानगर येथील बेलदार वस्तीतील घराच्या भिंतीना तडे जाऊन या वस्तीतील चार ते पाच घरांचे नुकसान झाले आहे.मात्र सोशल मीडियावर “फोंडाघाट मध्ये भूकंप, फोंडाघाट हादरले या अशयाच्या आलेल्या बातम्यामुळे फोंडाघाट मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान याबाबत तेथील प्रत्यक्ष रहिवासी सोमनाथ चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री 11:30 दरम्यान घरातील वस्तू पडल्याचा आवाज झाला यानंतर सकाळी उठून पाहिले असता आपल्या घरातील भिंतीना तडे गेले असल्याचे प्रथमदर्शी निदर्शनास आले त्यामुळे आपल्या घराला लागूनच असलेल्या दोन्ही भावंडांच्या घरांची पाहणी केली असता त्या ठिकाणी सुद्धा काही अंशी घराच्या भिंतींना तडे गेल्याचे निदर्शनास आल्याचे सांगितले




याबाबत तातडीने फोंडाघाट सरपंच सौ. संजना आंग्रे यांना कळविल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष ठिकाणी येऊन पाहणी केल्यानंतर अंदाजे भूकंप सदृश्य परिस्थिती असल्याचे वाटल्याने याबाबत त्यांनी महसूल विभागाला याची माहिती दिली यानंतर तेथील नागरिकांना
आपण शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान बुधवारी सायंकाळी कणकवलीचे प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, यांच्यासहित मंडळ अधिकारी येंडे,तलाठी समृद्धी गवस,माजी सभापती सुजाता हळदीवे, दर्शना पेडणेकर आदी घटनास्थळी दाखल होत. त्यांनी प्रत्यक्ष वस्तू स्थितीची पाहणी केली. परंतु भूकंप झाल्याची नोंद अधिकृतरित्या प्रशासन दरबारी नसल्याचे तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी यावेळी सांगितले असून त्यामुळे घरांना गेलेले तडे हे नेमके कशामुळे गेले त्याची माहिती प्रशासनाकडून घेतली जात आहे.
असेही श्री देशपांडे यांनी सांगितले. घराच्या आसपास डोंगर भाग आहे का ही खातरजमा केली. परंतु सदरची तडे गेलेली घरे ही सपाट भागात असल्याचे तहसीलदारांकडून सांगण्यात आले. फोंडाघाट येथील रविंद्र सुरेश चव्हाण, दत्ताजी सुरेश चव्हाण, सोमनाथ सुरेश चव्हाण तसेच बाळू मारुती चव्हाण यांच्या घरांना तडे जाऊन नुकसान झाल्याचे समोर आले आहे. आज घडलेल्या घटनेची नोंद महसूल विभागाकडून घेण्यात आली असून याबाबतची अधिकची माहिती घेतली जात असल्याचे देखील श्री. देशपांडे यांनी सांगितले.सायंकाळी उशिरापर्यंत नुकसानीचे पंचनामे सुरु असल्याने नुकसानीचा निश्चित आकडा समजून येत नाही.