फोंडाघाट महाविद्यालयात सर्जनशील लेखन उपक्रम उत्साहात संपन्न; ऋतुजा कदम प्रथम
फोंडाघाट : १२ सप्टेंबर
फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथील मराठी विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्जनशील लेखन क्षमतेला चालना देण्यासाठी ‘सर्जनशील लेखन उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमात महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध विषयांवर आपले सर्जनशील लेखन सादर केले.
विद्यार्थ्यांमधील कल्पनाशक्ती, निरीक्षणशक्ती, अभिव्यक्ती कौशल्य आणि लेखनाची क्षमता विकसित करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. या दरम्यान विद्यार्थ्यांकडून विविध विषयांवर कविता, लघुलेखन, अनुभवलेखन, वैचारिक लेखन आदी स्वरूपांत सर्जनशील लेखन करून घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीला शब्दरूप देत उत्स्फूर्तपणे लेखन केले.
सादर करण्यात आलेल्या लेखन साहित्याचे तज्ज्ञ परीक्षकांकडून परीक्षण करण्यात आले. या लेखन स्पर्धेत कुमारी ऋतुजा कदम हिने प्रथम क्रमांक, कुमारी नीता धुरी हिने द्वितीय क्रमांक, तर कुमारी अस्मिता कदम हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. यशस्वी विद्यार्थ्यांचा तसेच सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांनी, “सर्जनशील लेखन हे केवळ लेखनकौशल्य विकसित करणारे माध्यम नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना, भावनांना आणि कल्पनाशक्तीला दिशा देणारी प्रक्रिया आहे. अशा उपक्रमांमधून भविष्यातील कवी आणि लेखक घडतील,” असा विश्वास व्यक्त केला.
मराठी विभागप्रमुख डॉ. सतीश कामत यांनी सर्जनशील लेखनाची अभिनव संकल्पना राबवून विद्यार्थ्यांना लेखनाच्या प्रत्यक्ष प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली. विद्यार्थ्यांनी केवळ साहित्य वाचण्याबरोबरच स्वतः लेखन करावे, त्यांच्या लेखनातील सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळावे आणि नवोदित लेखक-कवींच्या प्रतिभेला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यशाळेचे संयोजन प्रा. जगदीश राणे यांनी केले. कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने मराठी विभागाच्या या अभिनव उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.