सावंतवाडीच्या निसर्गसौंदर्याच्या संवर्धनासाठी इको-सेंसिटिव्ह झोन गरजेचा – डॉ. जयेंद्र परुळेकर

शेअर करा

शहरातील पर्यावरणाचे रक्षण आणि नैसर्गिक वारसा जपण्यासाठी इको-सेंसिटिव्ह झोन जाहीर करण्याची मागणी

सावंतवाडी,दि.२७ ऑगस्ट
सावंतवाडी शहाराचे निसर्ग सौंदर्य वाचण्यासाठी इको सेन्सिटिव्ह झोन जाहीर होणे गरजेचे आहे असे सामाजिक कार्यकर्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांनी म्हटले आहे.

केंद्रीय वन आणि पर्यावरण खात्याने दि २७ जुलै २०२६ रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार पश्चिम घाटातील सहा राज्यांतील अनेक गावे इको सेन्सिटिव्ह करण्यात यावीत या संदर्भात सूचना व हरकती मागवलेल्या आहेत, असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात डॉ जयेंद्र परुळेकर स्पष्ट केले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील ५१ गावे इको सेन्सिटिव्ह जाहीर करण्यात यावीत या संदर्भात सूचना किंवा हरकती मागवण्यात आलेल्या आहेत.

या ५१ गावांमध्ये सावंतवाडी नगरपरिषदेतील शहराचा देखील समावेश आहे.
सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांनी सावंतवाडी शहर इको सेन्सिटिव्ह “नको” असा एकमताने ठराव केलेला आहे.

एखादे गाव किंवा छोटे गाववजा शहर इको सेन्सिटिव्ह होणे म्हणजे तिथे “नो डेव्हलपमेंट झोन” जाहीर होणे किंवा त्या गावाचा/शहराचा संपूर्ण भूभाग शासकीय वन जाहीर होणे असा गैरसमज जाणीवपूर्वक पसरवला जात आहे.
हे पूर्णतः असत्य आहे.

आज महाराष्ट्रात महाबळेश्वर पांचगणी आणि माथेरान ही पर्यटन स्थळे गेली पंचवीस वर्षे इको सेन्सिटिव्ह झोन आहेत.
त्या दोन्ही पर्यटन स्थळांचा मोठा आर्थिक विकास गेल्या पंचवीस वर्षांत झालेला आहे.

एखादे गाव किंवा छोटे शहर जेंव्हा इको सेन्सिटिव्ह झोन जाहीर होतं तेंव्हा त्या भागात कुठलेही प्रदूषणकारी प्रकल्प (मायनिंग, औष्णिक ऊर्जा प्रकल्प, रेड कॅटेगरी इन्डस्ट्रीज्) येऊ शकत नाहीत.
पण एखाद्या गावाच्या किंवा छोट्या शहराच्या विकासासाठी आवश्यक रस्ते, हाॅस्पिटल, हाॅटेल,रिसाॅर्ट अशा सर्व गोष्टींना परवानगी मिळू शकते.
पर्यटनाच्या आणि सर्व हरित प्रकल्पांना सहज परवानगी मिळते.

त्या मुळे सुंदरवाडी म्हणून प्रसिद्ध असलेल्या निसर्गरम्य सावंतवाडी शहराचे “काॅंक्रिट जंगलात” रूपांतर होऊ नये अशी ज्या नागरिकांची इच्छा असेल त्यांनी [email protected] या ईमेलवर आपल्या सूचना, समर्थन नोंदवावे किंवा
केंद्रीय वने पर्यावरण हवामान बदल मंत्रालय, इंदिरा पर्यावरण भवन,जोरबाग रोड,नवी दिल्ली ११०००३ या पत्त्यावर आपल्या सूचना पाठवाव्यात.

सावंतवाडी इको सेन्सिटिव्ह होऊ नये अशी ज्यांची इच्छा आहे ते खरंतर बिल्डर लाॅबीचे हित जपत आहेत.
गेल्या पंचवीस वर्षांत विकासाच्या नावाखाली अनेक मोठमोठ्या वृक्षांची तोड झालेली आपण सर्वांनी पाहिलेली आहे.
सावंतवाडी शहराचा विकास येथील निसर्ग सौंदर्य, येथील उरलेले वृक्ष अबाधित ठेवून व्हावा अशी ज्या नागरिकांची इच्छा आहे त्यांनी आपापल्या सूचना समर्थन लवकरात लवकर पाठवणे गरजेचे आहे, असे आवाहन डॉ जयेंद्र परुळेकर यांनी केले आहे.

शेअर करा