सावंतवाडी,दि.२५ ऑगस्ट
बिगरपरवाना बेकायदेशीर ४ बंदुका आणि खवले मांजर या प्राण्याची १५४ खवले जवळ बाळगल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी ४ जणांवर कारवाई करत त्यांना अटक केली आहे. सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवसू व दाणोली भागात टाकलेल्या छाप्यात एकूण ७० हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली ३ पथकांनी देवसू व दाणोली परिसरातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी ही छापेमारी केली.
जप्त केलेला मुद्देमाल व आरोपी:
देवसू पलीकडचीवाडी: गजानन उर्फ अर्जुन सावंत (वय ४२) याच्या घराची झडती घेतली असता २० हजार रुपये किमतीची १ ठासणीची बंदूक, १० हजार रुपये किमतीची १ कारतुसाची बंदूक आणि १.१३५ ग्रॅम वजनाची खवले मांजराची १५४ लहान-मोठी खवले जप्त करण्यात आली.
दाणोली गावठणवाडी: अशोक लक्ष्मण सावंत (वय ६०) याच्या घरातून २५ हजार रुपये किमतीची १ ठासणीची बंदूक जप्त करण्यात आली.
देवसू जाधववाडी: संतोष विठ्ठल जाधव (वय ४२) याच्या घरातून २५ हजार रुपये किमतीची १ ठासणीची बंदूक जप्त करण्यात आली. ही बंदूक सुरज धर्मेंद्र सावंत (वय २९, रा. देवसू मधलीवाडी) याची असून त्याने संतोष जाधव याच्याकडे ठेवण्यासाठी दिली होती.
या तिन्ही कारवायांमध्ये एकूण ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षद हिंगे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील, पोलीस अंमलदार निलेश परब, महेश निरवडेकर, ज्योती दुधवडकर, अमित राऊळ, संतोष गलोले, रामदास जाधव, मनिष शिंदे, सचिन चव्हाण, अमिता दळवी आणि पुजा भाटे यांच्या पथकाने केली.